भाजपने काँग्रेसला घेरले!

भाजपने काँग्रेसला घेरले!

लडाखमधील गलवान खोर्‍यात चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यापासून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रोजच्या रोज नवे प्रश्न उपस्थित करून सरकारला कात्रीत पकडत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने काँग्रेसला मिळणार्‍या चिनी पैशांचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या या आरोपांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडत काँग्रेस सत्ताधार्‍यांवर आता काय हल्लाबोल करतोय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अहमद पटेल यांची ईडीकडून चौकशी
संदेसारा घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक शनिवारी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले असून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. याआधी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि करोनाच्या गाईडलाईन्समुळे चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे सांगत पटेल चौकशीसाठी गेले नव्हते. चौकशी पथकामध्ये ईडीच्या तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे.

स्टर्लिंग बायोटेक कंपनी लिमिटेड आणि संदेसारा समूहाचे प्रमुख प्रमोटर नितीन संदेसारा, चेतन संदेसारा आणि दिप्ती संदेसारा यांनी बनावट कंपन्या तयार करून बँकांना १४ हजार ५०० कोटींचा गंडा घातला आहे. ईडीने याप्रकरणी स्टर्लिंग बायोटेकची ९ हजार कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये नायजेरियातील ऑईल रिग, एक जहाज, एक विमान आणि लंडनमधील संपत्ती जप्त करण्यात आली होती.

नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा दावा
संदेसारा समूहाने शेल कंपनीच्या सहाय्याने भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांमधून ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले होते. तसेच स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडने भारतीय बँकांकडून भारतीय आणि परदेशी चलनातही कर्ज घेतले होते. संदेसारा समूहाने आंध्रा बँक, यूको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाकडूनही कर्ज घेतले होते. सीबीआयने ऑक्टोबर २०१७ मध्ये कंपनी आणि प्रवर्तकांविरूद्ध ५ हजार ३८३ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, ईडीनेदेखील खटला दाखल केला. ईडीने दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम त्यापेक्षाही अधिक असल्याचे समोर आले होते. संदेसारा बांधवांनी नीरव मोदीपेक्षा जास्त मोठा घोटाळा केला आहे, असा दावा ईडीने केला आहे.

राजीव गांधी फाऊंडेशनला  चीनकडून निधी कशासाठी?

 पीएम नॅशनल रिलीफ फंड हा जनतेची सेवा करण्यासाठी आहे. असे असताना साल २००५-२००८ या दरम्यान यातील निधी राजीव गांधी फाऊंडेशनला का देण्यात आला? राजीव गांधी फाऊंडेशनला २००५-२००९ या दरम्यान चीन दूतावासाकडून आर्थिक निधी का मिळाला? स्वार्थ साधण्यासाठी काँग्रेसने विदेश शक्तींशी आर्थिक हितसंबंध का ठेवले?, राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीन यांच्यात काय संबंध आहे?, याचा काँग्रेसने खुलासा करावा, अशा प्रश्नांचा भडिमार शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेतून केला. चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनसाठी निधी देण्यात आला होता, अशा आशयाचा आरोप करण्यात आला होता. त्यावर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी फाऊंडेशन पैसे परत करेल, असे म्हटले आहे. जामिनावर बाहेर असलेले देशाचे माजी अर्थमंत्री यांनी हे मान्य केल्यामुळे काँग्रेसने देशाचे अहित साधून शत्रू राष्ट्राकडून निधी स्वीकारल्याचा गंभीर आरोप नड्डा यांनी यावेळी केला. पीएम नॅशनल रिलीफ फंड हा जनतेची सेवा करण्यासाठी असताना २००५-२००८ या दरम्यान यातील निधी राजीव गांधी फाऊंडेशनला का देण्यात आला? राजीव गांधी फाऊंडेशनला २००५-२००९ या दरम्यान चीन दूतावासाकडून आर्थिक निधी का मिळाला?

तसेच २००६-२००९ पर्यंत फाऊंडेशनला लक्झेंबर्गकडून देणग्या का मिळाल्या? आर्थिक हितसंबंधांसाठी काही कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला देणग्या दिल्या, असाही आरोप नड्डा यांनी केला. व्यक्तिगत स्वार्थासाठी विदेश शक्तींकडून पैसे स्वीकारणे राष्ट्रहिताचे बलिदान देण्यासारखे आहे, असे सांगत त्यामुळे राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीन यांच्यात काय संबंध आहे, याचा काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

कॅग, माहिती अधिकारापासून फाऊंडेशनला ठेवले दूर
राजीव गांधी फाऊंडेशनचे कॅगकडून ऑडिट करवून घेण्यात नकार का देण्यात आला?, तसेच या फाऊंडेशनला माहिती अधिकारापासून दूर का ठेवण्यात आले? याचे लेखा परीक्षक कोण आहेत? मेहुल चोकसीकडून राजीव गांधी फाऊंडेशनने निधी का घेतला?, तसेच काँग्रेसने सत्ताकाळात मेहुल चोकसीला कर्ज का दिले? राजीव गांधी फाऊंडेशनचा मेहुल चोकसीशी काय संबंध आहे, हे देशाला जाणून घ्यायचे आहे? आणि आपण त्याला कर्ज देण्यात कशी मदत केली, हे देश जाणून घेऊ इच्छित आहे, असेही जेपी नड्डा म्हणाले.

First Published on: June 28, 2020 6:47 AM
Exit mobile version