लव्ह जिहादचा मुद्दा राजकीय स्वार्थासाठी; अजित पवारांची टीका

लव्ह जिहादचा मुद्दा राजकीय स्वार्थासाठी; अजित पवारांची टीका

संग्रहित छायाचित्र

 

सांगलीः लव्ह जिहादचा मुद्दा केवळ राजकीय स्वार्थासाठी उपस्थित केला जात आहे. या मुद्द्याद्वारे जाती जातीत तेढ निर्माण केला जात आहे. समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी भाजपवर केली.

सांगली येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, लव्ह जिहादच्या मुद्दा पुढे करुन जाती जातीत तेढ निर्माण केला जात आहे. जे अखंड समाजासाठी घातक आहे. सद्यस्थितीत समाजात जे सुरु आहे, त्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र त्याविरोधात उठाव होताना दिसत नाही.

प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करायला हवा. दुसऱ्याच्या धर्माबद्दल आकस बाळगा असे कोणताच धर्म सांगत नाही व शिकवतही नाही. स्वतःच्या धर्माची प्रार्थना स्वतःच्या घरात करा किंवा मंदिरात करा. पण घऱातून बाहेर पडताना एक माणूस म्हणून बाहेर पडा, असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे झालेल्या शपथविधीवर अजित पवार म्हणाले, सारखे सारखे ते उगाळू नका. त्या घटनेला आता तीन वर्षे झाली आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांनी त्या घटनेवर पडदा टाकला आहे. पुन्हा पुन्हा तेच तेच विचारण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी व सद्यस्थितीत जे काही सुरु आहे त्यावर बोला. या विषयांवार सोशल मिडियावर जनजागृती करायला हवी, असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

सांगली येथील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवार यांनी लिव्ह जिहादच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

हिंदू सकल समाजाच्या नेतृत्त्वात मुंबईत लिव्ह जिहादच्या कायद्यासाठी मोर्चा निघाला. शिवाजी पार्क येथून निघालेल्या मोर्चात भाजपचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. या मोर्चात उद्धव ठाकरे व त्यांच्या गटावर भाजप नेत्यांनी टीका केली. हा कायदा किती आवश्यक आहे हे पटवून देण्याचे काम भाजप नेते करत होते.

 

First Published on: January 29, 2023 4:05 PM
Exit mobile version