म्युकर मायकोसिसचा महात्मा फुले योजनेत समावेश, उपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध – अजित पवार

म्युकर मायकोसिसचा महात्मा फुले योजनेत समावेश, उपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध – अजित पवार

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसीवीरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ३० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशिघ्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

राज्यासाठी २५ हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर निविदा काढण्यात येत आहे. ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या ‘पीएसए’ प्लॅन्टची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ३०१ प्लॅन्ट उभारण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी ३८ प्लॅन्ट कार्यरत आहेत. या ३८ प्लॅन्टमधून ५१ मेट्रीक टन ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘पीएसए’ प्लॅन्ट उभारण्यात येत आहेत. २४० प्लॅन्ट उभारण्यासाठीची वर्क ऑर्डर देण्यात आली असून त्याची प्रक्रिया सुरु आहे. येत्या काही काळात सर्व प्लॅन्टद्वारेच राज्यात एकूण सुमारे ४०० मेट्रीक टन प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या ऑक्सिजनद्वारे १९ हजारपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची गरज पुर्ण होईल असेही अजित पवार यांनी सांगितले.

उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनचे राज्यात कार्यक्षमपणे वितरण होण्यासाठी कोविड रुग्णांची जिल्हानिहाय संख्या लक्षात घेऊन वितरण करण्यात यावे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दोन विभागांसाठी सचिव दर्जाचे अधिकारी त्यावर लक्ष ठेऊन त्याचे नियंत्रण करत आहेत. त्यांनी राज्यात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्लॅन्टच्या उभारणीच्या कामात समन्वय ठेवत काम वेगाने करुन घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीचे व्यवस्थापन आणि लेखापरिक्षण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यातील प्लॅन्टच्या व रुग्णालयाच्यास्तरावर टेक्नीकल ऑडिट व मेडिकल ऑडिट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावे. ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन नर्सची नियुक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.

First Published on: May 17, 2021 10:38 PM
Exit mobile version