‘अहो त्या कमळाबाईला विचारा ना’; अजित पवारांचा भाजपला टोला

‘अहो त्या कमळाबाईला विचारा ना’; अजित पवारांचा भाजपला टोला

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

‘आधी घड्याळाचे बटण दाबा… घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता… अहो त्या कमळाबाईला विचारा ना’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत लगावला. अजित पवार यांचे सडेतोड भाषण सुरु असतानाच एक शेतकरी पैसे मिळत नाही, अशी तक्रार करायला उभा राहिला. त्यावेळी त्यांनी ही कोपरखळी केली.

जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाला

जलयुक्त शिवाराची हजारो गावं टँकरमुक्त झाल्याचे सांगितले जात आहे. कुठे झाली आहेत दाखवा? आज पाथर्डी, शेवगावमध्ये १२३ गावात टँकरने पाणी का दिले जात आहे, उत्तर द्या. या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी कशी झाली पाहिजे तर दोन महिन्यात कर्जातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. परंतू आज तसे होत नाही. नुसती पोकळ आश्वासनं, गाजरं दाखवून उपयोग नाही. त्यासाठी काम केलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सरकारने अद्याप कृषीमंत्री दिला नाही 

तुटपुंजी मदत देवून शेतकर्‍यांची चेष्टा का करत आहात. अन्नधान्याने पवार साहेबांनी देशाला स्वयंपूर्ण केले आणि आज देशाची काय परिस्थिती आहे. कांद्याचे वांधे करुन टाकले आहेत. एका शेतकर्‍याला कांदा विक्रीतून किती पैसे मिळाले याची पावती वाचून दाखवली. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या मृत्यूनंतर सर्वात मोठ्या शेतकरी जातीला अद्याप कृषीमंत्री सरकारने दिलेला नाही, असेही अजित पवार म्हणाले. चारा छावण्यांबाबत सरकारने काढलेला जीआरचा समाचार यावेळी दादांनी आपल्या भाषणात घेतला. एखाद्या शेतकर्‍याकडे पाच-सहा गुरे आहेत. मग पाचच्यावर गुरे असतील तर शेतकऱ्यांनी बाकीची गुरं कुठे न्यायची. म्हणजे यांचे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले तसे पाहुण्यांकडे गुरे नेवून बांधायची असेच सरकार करायला लावत आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर का उठला आहात. तो सर्वांना जगवतोय. मंत्र्यांचे कारखाने आहेत त्यांनी एफआरपी दिली का. हे कुठल्या तोंडानी सांगणार आहात, असा सवालही त्यांनी केला.

अजित पवारांनी घेतली कोपरखळी 

या सरकारची थापेबाजी सुरु आहे. चुकीचे आदेश काढत आहेत हे वेळीच ओळखा. कसल्या लाल- पिवळ्या याद्या काढता. हा सिग्नल आहे का लाल, पिवळा, हिरवा दिसला की थांबा आणि जावा हे काय चाललं आहे, असा संतप्त सवालही पवार यांनी केला. बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अहो १६ रुपये महिन्याला सरकार देणार आहे, का चेष्टा करत आहात. आधी लहान-लहान गाजरं दाखवत होते आणि आज मोठा गाजर दाखवला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

First Published on: February 1, 2019 10:31 PM
Exit mobile version