आगामी निवडणूकींसाठी अजित पवारांचा पुढचा डाव; “भाजपमध्ये गेलेल्या ४०-४५ आमदारांना….”

आगामी निवडणूकींसाठी अजित पवारांचा पुढचा डाव; “भाजपमध्ये गेलेल्या ४०-४५ आमदारांना….”

संग्रहित छायाचित्र

आगामी काळात होणाऱ्या निवडणूकींसाठी महाविकास आघाडीने आता कंबर कसलीय. कसब्याप्रमाणेच राज्यातही भाजपला नामोहरम करण्यासाठी आता महाविकास आघाडीचा नवा प्लॅन तयार झालाय. नुकतंच अजित पवारांनी या नव्या प्लॅनबाबत सूचक वक्तव्य केलंय.

शिवसेनेला भगदाड पाडत ४० आमदार आणि १२ खासदारांना आपल्या बाजूने घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार करणारं एकनाथ शिंदे यांचं बंड राज्यासह देशभरात गाजलं. तसंच गेल्या वर्षभरात भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. महाविकास आघाडीलाच सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आपल्या पक्षात आणण्याची नवी रणनिती आखली जात आहे. याबाबत स्वतः विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माहिती दिली,
याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, याआधी देशात अनेक नेत्यांचा करिष्मा होता. कधीकाळी इंदिराजींकडे, राजीवजींकडे पाहून, वाजपेयी यांच्याकडे पाहून मतदान झालेलं आपण पाहिलं आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून मतदान झालं, असही पवार यांनी नमूद केलं.

यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, आपल्या हक्काची काही मते तसेच काही पक्षाची मते यांच्या भरोशावर निवडून येणं त्याकाळी संबंधित नेत्यांना सोपं गेलं. शेवटी एखाद्या आमदाराला मतदारसंघाचा विकास करायचा असतो. त्याला जनतेला कामे दाखवायची असतात. पूर्वीच्या काळासारखं एखाद्या विचारधारेला मानून विरोधात राहिलं तरी चालेल पण पक्ष सोडणार नाही, अशी लोकांची आता मानसिकता राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मागील काळात झालेल्या चुका संबंधित लोक सुधारु शकतात”, असं सांगत भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा घरवापसी करू शकतात, असे सूतोवाच अजित पवार यांनी दिले.

“आमच्यातले काही नेते २०१४ ला आम्हाला सोडून गेले, काहींनी २०१९ ला पक्ष बदलला. २०१४ ला भारतीय जनता पक्षाने एक असं चित्र निर्माण केलं की नरेंद्र मोदींचा करिश्मा संपूर्ण भारतावर निर्माण झालाय आणि ते सत्तेत आल्यावर खूप मोठे बदल होतील, असा भ्रम निर्माण केला गेला. त्यांच्याकडे बघून जनतेने कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत मतदान केलं आणि त्यांना क्लिअर मॅजोरिटी मिळवून दिली. राजीव गांधीनंतर देशात कुणालंही असं बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचंय पण त्यांना फक्त आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवायचाय, त्यांना मतदारसंघात विकास करायचाय, असे लोक त्यावेळी भाजपमध्ये गेले”, असं देखील अजित पवार म्हणाले.

“पण आता बदलत्या परिस्थितीत तिकडे गेलेले लोक पुन्हा मूळ पक्षात परतू शकतात. ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगू शकतात. आमची चूक झाली. शेवटी माणसांकडूनच चुका होतात. तालुक्याचा-जिल्ह्याचा विकास व्हावा, म्हणूनच लोक पक्ष सोडण्याचे निर्णय घेत असतात. पूर्वीसारखं पक्षाच्या विचारधारेला चिकटून लोक आता राहत नाहीत”, असं सांगताना येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेतच अजित पवार यांनी दिले. यावेळी “राजकारणात कालचा शत्रू आज मित्र असतो आणि आजचा मित्र उद्या शत्रू असतो”, असंही अजित पवार म्हणाले.

First Published on: March 6, 2023 6:07 PM
Exit mobile version