राष्ट्रवादी पुन्हा! शेतकरी वर्गानं चांगला कौल दिला, विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी पुन्हा! शेतकरी वर्गानं चांगला कौल दिला, विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आज समोर आले आहेत. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपला मविआनं चांगलाच दणका दिला आहे. राष्ट्रवादीने बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील १८ जागांपैकी सर्व १८ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, या विजयानंतर बारामतीमधून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी वर्गानं चांगला कौल दिला, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शेतकरी वर्गाने आम्हाला चांगला कौल दिला आहे. यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली आहे. मतदारांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने बजावलं. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. बारामतीमध्ये प्रत्येक निवडणुकीत म्हणजे विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत ८० ते ८५ टक्के मत देण्याची जी परंपरा आहे ती मतदारांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन, असं अजित पवार म्हणाले.

बारामतीमध्ये आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीने काम करतोय, याची पोहोचपावती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली असून ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू, असं अजित पवार म्हणाले.

बारसू प्रकल्पाच्या आंदोलनासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, विकास कामाला आमचा कधीच विरोध नाही. विकास करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. तसेच येथील सौंदर्य देखील अडचणीत येणार नाही. मासेमारी करणारे व्यवसायधारक कधीच अडचणीत येणार नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून संवेदनशील मार्गाने सर्वांशी चर्चा करून सरकारने यामधून मार्ग काढावा, असंही अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा : रायगडावर भरगच्च कार्यक्रम, किल्ल्यांवर शिववंदना; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती


 

First Published on: April 29, 2023 5:32 PM
Exit mobile version