काही लोकं आपल्या आईला मातोश्रीच म्हणतात; अजितदादांची यशवंत जाधवांच्या डायरीवर रोखठोक प्रतिक्रिया

काही लोकं आपल्या आईला मातोश्रीच म्हणतात; अजितदादांची यशवंत जाधवांच्या डायरीवर रोखठोक प्रतिक्रिया

 

शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाला सापडलेल्या डायरीवरुन बरीच चर्चा सुरु आहे. त्या डायरीमध्ये मातोश्रीला २ कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकं आपल्या आईला मातोश्रीच म्हणतात, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना यशवंत जाधव यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. ‘एजन्सी त्यांच्या प्रमाणे काम करेल. अशा चौकशा होत असतात. यशवंत जाधव यांनीच याबाबत उत्तर दिलं आहे. मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो. बरेच जण आपल्या आईला मातोश्री म्हणतात का नाही म्हणतात? काहीजण आई म्हणतात…काहीजण मातोश्री म्हणतात. ते स्वत:च म्हणतात, मग तुम्ही पुन्हा पुन्हा का अधिक उकळी देण्याचं काम करता?’ असं अजित पवार म्हणाले.

सुजय विखेंवर खरमरीत टीका

खासदार सुजय विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटलांवर खरमरीत टीका केली. ज्यांना कुणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात. ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचं. ज्यांनी केलेल्या स्टेटमेंटला गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशा स्टेटमेंटबद्दल आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या स्टेटमेंटला फार काही महत्त्व द्यायची गरज नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी विखेंना फटकारलं.

 

First Published on: March 28, 2022 9:01 PM
Exit mobile version