अखेर ठरलं! अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला ३ डिसेंबरचा मुहूर्त

अखेर ठरलं! अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला ३ डिसेंबरचा मुहूर्त

नाशिक – कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. त्यानुसार आता हे संमेलन ३, ४ आणि ५ डिसेंबरला भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानावर रंगणार, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना संमेलनाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणात यापूर्वी संमेलन होणार होते. मात्र, त्याठिकाणी पार्किंगसाठी मर्यादित जागा होती. त्यामुळे एकमताने भुजबळ नॉलेज सिटीच्या मैदानावर संमेलन घेण्याचे ठरले. त्याआधी संदीप फाऊंडेशन आणि भुजबळ नॉलेज सिटी या दोन्ही मैदानांची पाहणी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी यांनीही मैदानाची पाहणी केली असून, त्यांनी भुजबळ नॉलेज सिटीच्या जागेला पसंती दिली. भुजबळ नॉलेज सिटीमध्ये संमेलनासाठी हवे तितके बंदीस्त हॉल आहेत. याशिवाय बिल्टअप साऊंड व्यवस्था असलेले हॉल आहेत. त्यामुळे एकाच वेळी अनेक कार्यक्रम घेता येतील. मुख्य कार्यक्रमासाठीच फक्त मंडप टाकण्याची गरज भासणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीमध्ये व्हीआयपींसाठी २०० प्रशस्त खोल्या आहेत. तसेच, शेजारीच समाजकल्याण विभागाच्या १ हजार खोल्या साहित्यिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे. संमेलनस्थळी जाण्या-येण्यासाठी विनामुल्य बसेस उपलब्ध केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा. शंकर बोर्‍हाडे, संजय करंजकर, दिलीप साळवेकर, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

भुजबळ नॉलेज सिटीमध्ये संमेलनासाठी लागणार्‍या कवी कट्ट्यासाठी येथील अॅम्फी थिएटरचा वापर करता येईल. याशिवाय वेगवेगळ्या हॉलमध्ये ग्रंथ प्रदर्शन आणि बाल साहित्य मेळावाही घेता येईल. ३ डिसेंबरला सकाळी कुसुमाग्रज निवासस्थानापासून ग्रंंथ दिंडी निघेल. दिंडी पंचवटीपर्यंत आल्यानंतर बसेसने ही दिंडी संमेलनस्थळी येईल. त्या दिवशी दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. ४ डिसेंबरला रामदास भटकळ यांची मुलाखत असून, रात्री नाशिकच्या कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ५ तारखेला मुंबईहून येणार्‍या कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

असे आहेत तीन दिवसांचे कार्यक्रम

बुधवारी (दि. ३) रोजी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून दिंडी निघून रविवार पेठ, पंचवटीत येईल. तेथून सर्वजण बसने भुजबळ नॉलेज सिटीमध्ये येतील. सकाळी ११ वाजता संमेलनस्थळी ध्वजारोहण होईल. दुपारी ४ वाजेनंतर उदघाटनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर निमंत्रितांचे काव्यसंमेलन होईल. गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळांची मुलाखत आणि परिसंवाद होईल. सकाळी ११ वाजता बालसाहित्य मेळाव्याचे उदघाटन अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होईल. यावेळी नाटककार मनोहर शहाणे यांचा सत्कार केला जाईल. तसेच, ऑनलाईन वाचन, कवीकट्टा, प्रदर्शन होणार आहे. रात्री नाशिकच्या कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तर शुक्रवारी (दि. ५ डिसेंबर) रोजी संमेलन समारोप कार्यक्रम होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, असे जातेगावकर यांनी सांगितले.

First Published on: October 25, 2021 8:27 PM
Exit mobile version