हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला प्लॅन्ट अकोल्यात उभारणार – बच्चू कडू

हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला प्लॅन्ट अकोल्यात उभारणार – बच्चू कडू

राज्यमंत्री बच्चू कडू

अकोल्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅन्ट तयार करण्याचे उदिष्ट पालकमंत्री बच्चू कडू यांनी ठेवले आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा हा राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिला प्लॅन्ट असेल असे अशी माहिती अकोल्याचे पालकमंत्री  बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली आहे. अकोरल्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या पाहता हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी याठिकाणी पुढाकार घेण्यात आला आहे. अकोल्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊनच देशातील पहिला अशा प्रकारचा प्लॅन्ट तयार करण्याचे उदिष्ट बच्चू कडू यांनी ठेवले आहे.

अकोल्यातील नागरिकांना ऑक्सिजन होऊ नये म्हणून उपाययोजनांसाठीची आढावा बैठक अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. बैठकीमध्ये जिल्ह्यासाठी ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या विषयासोबतच अनेक आरोग्याच्या यंत्रणेशी संबधित मुद्द्यांवर चर्चा झाली. जिल्ह्यात होत असलेला ऑक्सिजनचा तुटवडाही याचाच एक भाग होता. त्यामुळेच ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करता येईल का ? या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. हवेतून ऑक्सिजन निर्मिती कंपनीकडून याप्रसंगी एक सादरीकरणही करण्यात आले. त्यामध्ये संभाव्य काय उपाययोजना करता येतील याबाबतचीही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत कंपनीचे सादरीकरण झाल्यानंतर अशा प्रकारची प्लॅन्टची निर्मिती करण्यासाठी प्रशासनाकडून तसेच पालकमंत्र्यांनीही हिरवा कंदील दिला. त्यामुळे हवेतल्या ऑक्सिजनपासूनचा प्लॅन्ट निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा प्लॅन्ट महिन्याभराच्या आतच तयार करण्यात येणार आहे. अकोल्यातच अकोट किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा प्लॅन्ट उभा राहू शकतो. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून प्लॅन्ट उभा करण्याचा हा अकोल्यातील पहिला वहिलाच प्रयत्न असणार आहे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


 

First Published on: April 16, 2021 3:16 PM
Exit mobile version