LockDown : अक्षय तृतीयेच्या सोनेखरेदीला झळाळी; ऑनलाईन सोनेखरेदीत ८ टक्क्यांची वाढ

LockDown : अक्षय तृतीयेच्या सोनेखरेदीला झळाळी; ऑनलाईन सोनेखरेदीत ८ टक्क्यांची वाढ

लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला सराफा बाजार अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर गजबजेल, असा अंदाज होता. पण लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने ही सोनेखरेदी आता सराफा बाजाराऐवजी ऑनलाईन सुरू झाली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोनेखरेदी करण्यासाठी लोकांनी ऑनलाईन पोर्टल्सवर गर्दी केली आहे. त्यामुळे ऑनलाईन सोनेखरेदीच्या प्रमाणात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

लॉकडाऊनचा परिणाम सराफा बाजारावरही झाला आहे. सोने-चांदी विक्री करणारी सगळी दुकानं बंद असल्याने बाजारात मंदी आहे. त्यातच सोन्या-चांदीच्या दरांमध्येही सातत्याने चढउतार होत आहेत. पण असं असतानाही ऑनलाईन सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. त्यातच अक्षय तृतीया येत असल्याने येत्या दोन-तीन दिवसांमध्ये हा प्रतिसाद आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ऑगमाँट ही कंपनी ऑनलाईन सोने-चांदी खरेदीच्या क्षेत्रात काम करत आहे. जवळपास २ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या या कंपनीच्या विक्रीत गेल्या महिन्याभरात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याचे दागिने आणि सोने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोनेखरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. नेमक्या याच काळात ऑनलाईन सोनेव्यापार तेजीत आला आहे, असं निरीक्षण ऑगमाँट कंपनीचे संचालक सचिन कोठारी यांनी सांगितलं.

भारतात ग्राहक चार ते पाच हजार रुपयांच्या किमतीची सोन्याची नाणी किंवा बिस्किटं घेण्याला पसंती देतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोनेव्यापार थंडावला होता. पण अक्षय तृतीया जवळ आल्यापासून ऑनलाईन सोनेखरेदीने जोर पकडला आहे. ही सोनेखरेदी ८ टक्क्यांनी वाढली आहे, असंही कोठारी यांनी स्पष्ट केलं.

First Published on: April 25, 2020 10:10 PM
Exit mobile version