प्रशासनाच्या नाकावर टिचून श्रीरामपुरात गावठी दारूची निर्मिती

प्रशासनाच्या नाकावर टिचून श्रीरामपुरात गावठी दारूची निर्मिती

कोरोनामुळे राज्यासह संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. मोठमोठ्या कारखान्यांपासून छोट्या दुकानांपर्यंत सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मात्र, दुसरीकडे संचारबंदी चोख बजावत असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिचून श्रीरामपूरात तब्बल ३० कुटुंबांमध्ये दररोज पहाटे सुमारे ४० हातभट्ट्या दारु काढली जाते. सध्या रस्त्यावर केवळ पोलिसांचे राज्य असताना येथून अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दररोज सुमारे ४ हजार लिटर दारूचा पुरवठा येथून केला जातो ही बाब प्रशासनापुढे मोठा प्रश्नचिन्ह उभा करणारी आहे.

अधिकाऱ्यांनी हात टेकले

गेल्या अनेक वर्षांपासून येथील वार्ड क्रमांक १ मधील गोंधवनी भागात हातभट्टीचा व्यवसाय सुरू आहे. प्रारंभी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या भट्ट्यांचा विस्तार वाढून आता सुमारे ३० ते ४० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे हे साधन बनले आहे. स्थानिक पोलिसांकडून अनेकदा जुजबी कारवाई केली जाते. परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा हा व्यवसाय तेजीत सुरू असतो. कर्तव्यदक्ष समजले जाणारे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे, कृष्णप्रकाश सिंग, ज्योतिप्रिया सिंग यांनी आपापल्या कार्यकाळात स्वतः येऊन या भट्ट्या बंद केल्या परंतु ते गेल्यानंतर पुन्हा या भट्ट्या सुरु असल्याचे श्रीरामपूरने पाहिले आहे.

मोठी आर्थिक उलाढाल

या भट्ट्यांमधून दररोज सुमारे ३ ते ४ हजार लिटर दारू निर्मिती होते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यासाठी आजही कोपरगावच्या एक व्यापाऱ्याच्या घरून काळा गूळ, नवसागर आदी काच्यामालाचहा पुरवठा केला जातो. पहाटे दोनच्या सुमारास टेम्पो रिक्षा भरून माळ उतरविला जातो. त्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत भट्ट्या सुरू असतात. मोटारसायकलवर बेलापूर, हरेगाव, कोपरगाव, खैरी निमगाव, गोंडेगाव, नाऊर, शिर्डी, पाचेगाव, पानगाव यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दारू पोचविले जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये येथूनच पुरवठा होतो.

सुमारे १५० मद्यापीची भेट

सध्या देशभरात कोरोनामुळे लोकडाऊन सुरू आहे. किराणा दुकान आणि मेडिकलमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळले जात आहे. बाकी दारू विक्री बंद असल्याने अनेकांनी तात्पुरता या दारूचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे परिसरातील शंभर ते दीडशे मद्यपी दररोज याठिकाणी भेट देऊन आपली तहान भागवितात. तेथे कुठलीही काळजी घेत नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात घालत असल्याची जाराशीही खंत कुणालाही नाही, असे चित्र आहे. दरम्यान, प्रशासनाच्या मर्जीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती तीही लोकडाऊनच्या काळात कशी सुरू आहे हे वेगळे सांगायला नको.

पोलिसांकडून सॅनिटायझर म्हणून वापर

काही दिवसांपूर्वी या हातभट्टी चालकांना कुठलाही मोबदला न देता दोघा पोलिसांनी प्रत्येकी ४० लिटरचे तीन कॅन भरून दारू नेली आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहॉलचा वापर केला जातो. त्यामुळे निर्जंतुकीकरणासाठी याचा वापर करणार असल्याचे अजब कारण सांगण्यात आले. आता इतकी दारू नेऊन कुठल्या उद्देशासाठी वापरली गेली हे सांगणे कठीण आहे.

– रवी भागवत


हेही वाचा – जगभरात कोरोनाची सद्यस्थिती : ७ लाख कोरोनाबाधित तर बळींची संख्या घाबरवणारी


 

First Published on: March 30, 2020 10:56 AM
Exit mobile version