कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे राज्यात अलर्ट

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे राज्यात अलर्ट

कोरोना व्हायरस

ब्रिटनमध्ये हातपाय पसरू पाहत असलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने आता देशातही शिरकाव केला आहे. देशभर या संसर्गाचे २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करता येऊ नये, अशा सूचना देत आघाडी सरकारने राज्यातील निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली आता जानेवारी अखेर सुरूच राहणार आहे.

नव्या कोरोना संसर्गाची लागण राज्यात २० जणांना झाल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने तात्काळ निर्बंध कायम ठेवणारे आदेश पारित केले त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आपत्कालीन सर्व नियम हे आधीच्या नियमाप्रमाणे सुरू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ब्रिटनमधील नव्या कोरोनाचे रुग्ण आढळल्याने राज्यात भीती पसरत असल्याचे मान्य केले. मात्र, राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही, असे स्पष्ट केले. पण गाफिल राहून चालणार नाही, असे त्यांनी बजावले. हे संकट लक्षात घेऊन ३१ डिसेंबरच्या रात्री ११ नंतर हॉटेल्स, पब्स बंद राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटकांनी गर्दी करू नये, चार पेक्षा जास्त लोक एकत्रित आले तर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. देशात नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण सापडल्याने केंद्र सरकारनेही तातडीने पावले उचलली आहेत.

लोकल ट्रेनही रखडणार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे राज्य सरकारने निर्बंध कायम ठेवले असल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन जानेवारी अखेरपर्यंत सुरू होणे दुरापास्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे सध्या प्रवासात होणारे हाल किमान जानेवारी अखेरपर्यंत तरी कायम राहणार आहेत.

इंग्लंडमध्ये फैलावलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण राज्यात सापडू लागल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अतिदक्षता घेण्याच्या सूचना राज्य सरकारने विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या. नव्या नियमानुसार सुरू असलेले निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आल्याने यादरम्यान सुरू नसलेल्या यंत्रणा बंदच राहतील, हे स्पष्ट आहे. यात प्रवासाची मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सर्वांना सुरू होण्याची शक्यता दुरावली आहे.

लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना नसल्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. मुंबईतील चाकरमान्यांचेही लोकल रेल्वे प्रवासाअभावी प्रचंड हाल होत आहेत. त्रासाचा हा काळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.केंद्रानेही नव्या कोरोना संसर्गाच्या शक्यतेनंतर इंग्लंडहून होणारी विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: December 31, 2020 7:08 AM
Exit mobile version