रुग्णसेवेचं व्रत घेतलेल्या एका डॉक्टरची अंगावर शहारा आणणारी कथा!

रुग्णसेवेचं व्रत घेतलेल्या एका डॉक्टरची अंगावर शहारा आणणारी कथा!

डावीकडे बाळाला तपासताना बाळाने डॉ. चांदोरकरांचं बोट धरलं तो क्षण... उजवीकडे डॉक्टरांनी बाळाला आणि त्याच्या मावशीला बाईकवर बसवून रुग्णालयात आणलं तो क्षण!

कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेविका आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र, तरीदेखील काही ठिकाणी अशा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याच्या किंवा शिवीगाळ केल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांबद्दलचा अभिमान अधिकच वाढवणारी एक घटना नुकतीच अलिबागमध्ये घडली आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील एका चिमुकल्याला अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे थेट आपल्या दुचाकीवरून रुग्णालयात दाखल करणाऱ्या या डॉक्टरांमुळेच त्या चिमुकल्याचे प्राण वाचू शकले. अंगावर शहारा आणणारी ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की घडलं काय?

अलिबागमध्ये राहणाऱ्या श्वेता प्रसूतीसाठी शहरातल्या डॉ. वाजे नर्सिंग होममध्ये दाखल झाल्या होत्या. पहिल्या प्रसूतीनंतर एका दिवसातच काही कारणामुळे बाळ दगावल्यामुळे त्या यावेळी तणावाखाली होत्या. डॉ. चंद्रकांत वाजे यांनी सीजेरीयन करून प्रसूती केली. यावेळी शहरातले प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांना देखील बोलावण्यात आलं होतं. पण जन्माला आल्यानंतर बाळ काही वेळातच काळं-निळं पडलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याला तातडीने एनआयसीयूमध्ये दाखल करणं गरजेचं होतं. पण नर्सिंग होममध्ये एनआयसीयूची सोय नव्हती. आणि बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे अॅम्ब्युलन्स लगेच उपलब्ध होणं शक्य नव्हतं.

बाका प्रसंग…

समोरचा प्रसंग बाका होता. अखेर डॉ. चांदोरकरांनी एक विलक्षण निर्णय घेतला. त्यांनी बाळ आणि रुग्णालयात नर्स असलेली बाळाची मावशी अशा दोघांना आपल्या दुचाकीवर बसवून थेट आनंदी हॉस्पिटल गाठलं. तिथे एनआयसीयूमध्ये बाळावर तातडीने उपचार सुरू झाले. काही काळ बाळ ऑक्सिजनवर देखील होतं. पण थोड्या वेळानं बाळाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली. आता एनआयसीयूमध्ये बाळावर व्यवस्थित उपचार सुरू असून ते सुस्थितीत आहे.

बाळानं घट्ट धरलं होतं डॉक्टरांचं बोट!

नुकच्याच जन्मलेल्या त्या चिमुकल्याला आपल्याला काय होतंय, याचीही कदाचित जाणीव होत नव्हती. पण आपल्याला काहीतरी होतंय आणि समोर उभी असलेली व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करतेय, याची जाणीव मात्र त्या चिमुरड्याला झाली असावी. म्हणूनच डॉक्टर एकीकडे त्याला तपासत असताना त्यानं आपल्या इवल्याशा हातात डॉक्टर चांदोरकरांचं एक बोट घट्ट पकडून ठेवलं होतं.

कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये देखील आपलं कर्तव्य निभावताना कोणतीही कसूर न ठेवणाऱ्या अशा असंख्य डॉक्टरांना ‘माय महानगर’चा मानाचा मुजरा!

First Published on: April 10, 2020 11:30 PM
Exit mobile version