अमित शाह मुंबईत; आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्‍ट्र भूषण पुरस्‍काराने होणार गौरव

अमित शाह मुंबईत; आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्‍ट्र भूषण पुरस्‍काराने होणार गौरव

मुंबईः राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज, रविवारी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता.

या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे सुरू असून श्री सदस्यांसाठी २ दिवस टोलमाफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे.

या सोहळ्यासाठी सुमारे २० लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतूक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५० टँकर आणि २ हजार १०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधादेखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरती शौचालये, ४२०० पोर्टेबल शौचालये, कार्यक्रमस्थळी ९ हजार तात्पुरती शौचालये बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४ हजार सफाई कर्मचारी, शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्किंगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शाह हे शनिवारी रात्री मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड, प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अमित शाह यांचे विमानतळावर स्वागत केले. भाजप नेते विनोद तावडे यांच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले. तावडे यांना भेटण्यासाठी केंद्रीय मंत्री शाह हे त्यांच्या विलेपार्ले येथील घरी गेले होते.

 

 

First Published on: April 15, 2023 11:07 PM
Exit mobile version