राहुल आणि पवारांना फक्त निवडणुकीत शेतकरी आठवतो – अमित शाह

राहुल आणि पवारांना फक्त निवडणुकीत शेतकरी आठवतो – अमित शाह

भाजप अध्यक्ष अमित शहा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्र सर्व क्षेत्रात मागे पडला होता. मात्र, भाजप सरकारने ५ वर्ष अहोरात्र परिश्रम घेऊन राज्याला नवसंजीवनी प्रदान केली, अशा शब्दात भाजपाध्यक्ष अमीत शहा यांनी बुधवारी सांगली येथील सभेत फडणवीस सरकारचे कौतुक केले. सांगलीत संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करताना शहा बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. राहुल आणि पवारांना फक्त निवडणुकीत शेतकरी आठवतो, असे अमित शाह म्हणाले.

नेमकं काय म्हणाले अमित शहा?

‘राहुल गांधी आणि शरद पवारांच्या पक्षाला फक्त निवडणुका आल्या की शेतकरी आणि गरीब आठवतो. मात्र, केंद्र आणि राज्य सरकाने मिळून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या असून त्याचा फायदा राज्यातील गरीब शेतकऱ्यांना मिळत आहे’, असे अमित शहा म्हणाले. राज्यात झालेल्या कर्जमाफी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा एकट्या सांगली जिल्हातील ११ लक्ष शेतकऱ्यांना फायदा झाला. काही प्रशासनिक कमतरता राहिल्यास राज्य सरकार त्या दूर करेल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

‘यंदाही मोदींना बहुमत मिळणार’

सिंचन घोटाळ्यावरून आघाडी सरकारला लक्ष्य करताना शहा म्हणाले की, ‘राज्यात काँग्रेसच्या शासनकाळात ७२ हजार कोटी रुपये खर्च करूनही शेतीला पाणी मिळाले नाही. परंतु, जलयुक्त शिवार योजनेमार्फत फडणवीस सरकारने १२ हजार गावांपर्यंत पाणी पोहचवले. यापूर्वीच्या काळात सिंचनासाठी दिलेला निधी कोणी पळवला, हे सगळ्या जनतेला माहिती आहे.’ शहा पुढे म्हणाले की, जनता नरेंद्र मोदींच्या कामावर खुश आहे. देशभरातून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाकडे बघता यंदाही मोदींच्या नेतृत्वात भाजपला प्रचंड बहुमत मिळणार यात तिळमात्र शंका नसल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांच्या नीतीचे पालन करणारे नेते असून देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर मोदींना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी यांनी केले. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले.

First Published on: April 17, 2019 4:56 PM
Exit mobile version