अमोल कोल्हेनी शिवबंधन सोडले, हाती घेतले घड्याळ

अमोल कोल्हेनी शिवबंधन सोडले, हाती घेतले घड्याळ

डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

स्वराज्यरक्षक संभाजीराजे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवबंधन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हेनी शरद पवार यांची त्यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ‘लहानपणी पवार साहेबांचा गावी दौरा असताना त्यांची छबी पाहता यावी, म्हणून मागे मागे पळायचो. आज पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश केल्याचा मला आनंद वाटतोय’, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी यावेळी दिली.

म्हणून राष्ट्रवादीत केला प्रवेश

‘आज तरुणांना विधायक मार्गाची गरज वाटत आहे. हे काम फक्त शरद पवारच करु शकतात. त्यासाठी शरद पवारांचे हात बळकट करण्याची गरज आहे. देशपातळीवर आता वातावरण बदलत आहे. या बदलत्या वातावरणात आपलाही खारीचा वाटा असावा, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.’, असे कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिरूरमधून शिवाजीरावांच्या विरोधात उतरणार

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात उभे राहण्यासाठी उमेदवार नव्हता. पक्षातर्फे दिलीप वळसे पाटील यांना लोकसभा लढवण्यास सांगितले होते. मात्र वळसे पाटील लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. २०१४ साली शिवाजीराव यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी सुमारे ३ लाख ४१ हजार मते मिळवली होती. मात्र तरिही ते ३ लाख मतांनी पराभूत झाले होते. डॉ. अमोल कोल्हे हे याच मतदारसंघातील नारायणगाव येथील आहेत. तसेच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे पात्र रंगवल्यामुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे. या प्रसिद्धीचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार का? हे आता निकालानंतर पाहावे लागेल.

तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ‘महाराष्ट्र आणि जगभरात कोल्हे यांनी स्वतःच्या कलेतून राजा शिवछत्रपती यांची प्रतिमा साकारली आहे. सध्या त्यांची स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही मालिकाही चांगली चालली असून अतिशय हुबेहुब असे संभाजी महाराज कोल्हे यांनी रंगवले आहेत. राष्ट्रवादीच्यावतीने कोल्हे यांचे स्वागत करतो.’

First Published on: March 1, 2019 4:22 PM
Exit mobile version