ही निवडणूक खासदाराची आहे, पंतप्रधानाची नाही – अमोल कोल्हे

ही निवडणूक खासदाराची आहे, पंतप्रधानाची नाही  – अमोल कोल्हे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांची आज चाकणमध्ये पहिली जाहीर सभा होती. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत ते शिरुर मतदारसंघातून निवडणूर लढवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची आज चाकण येथे जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी ही निवडणूक ही पंतप्रधान निवडीची नसून खासदार निवडीची आहे, असे म्हटले आहे.

नेमकं काय म्हटले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे म्हणाले की, ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांमध्ये एक भ्रम निर्माण करण्यात आला होता की, अध्यक्षीय लोकशाहीनुसार निवडणूक केली जात आहे. परंतु, मी १५ जानेवारीला पानीपत येथे गेलो होतो. त्यावेळी तिथे एक सरदार मला भेटले. ते सरदार भाजपला मतदान देऊन पश्चाताप करत होते. कारण त्यांनी पंतप्रधान कोण होईल, हे पाहून मतदान केले होते. त्यामुळे ही निवडणूक फक्त अध्यक्षीय लोकशाहीची निवडणूक नसून, ही खासदारांची निवडणूक आहे.’ यापुढे ते म्हणाले की, ‘ही निवडणूक माझ्या परिसरात खासदार निवडीची आहे. त्यामुळे पंतप्रधान कोण होणार, हे दिल्लीतील वरिष्ठ नेते ठरवतील.’

‘वैयक्तीक टीका करण्याची माझी संस्कृती नाही’

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, ‘उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी वैयक्तीक टीका केली. परंतु, मी वैयक्तीक टीका करणार नाही. कारण ती माझी संस्कृती नाही. तुम्ही माझ्यावर वैयक्तीक टीका जरुर करा. मला त्याची पर्वा नाही, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. त्यामुळे तुम्ही टीका करा, मात्र माझ्या एका प्रश्नाचे उत्तर जरुर द्या. माझ्यावर वैयक्तीक टीका केल्याने या भागातले गेल्या १५ वर्षांपासूनचे प्रश्न सुटणार आहेत का? माझ्यावर टीका करुन या भागात १५ वर्षांपासून सर्वसामान्यांची जी फसवणूक झाली, त्याचे उत्तर मिळणार आहे का? त्यामुळे या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो की, या भागाचा मी उमेदवार जरी जाहीर झालो असलो तरी मी या भागातील जनतेचा प्रतिनिधी आहे.’

First Published on: March 17, 2019 1:43 PM
Exit mobile version