खड्ड्यांविषयीच्या बैठकीला कंत्राटदार, अधिकार्‍यांचा ठेंगा

खड्ड्यांविषयीच्या बैठकीला कंत्राटदार, अधिकार्‍यांचा ठेंगा

खड्डे

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या खालापूर ते खोपोली दरम्यान झालेल्या प्रचंड दुरवस्थेबाबत मनसेच्या निवेदनावर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी बोलाविलेल्या बैठकीकडे कंत्राटदार, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जबाबदार अधिकार्‍यांनी पाठ फिरविल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी पुन्हा बैठक बोलाविण्यात आली असून, त्यात काही ठोस असे निष्पन्न झाले नाही तर मोठ्या जन आंदोलनाची तयारी मनसेसह स्थानिक नागरिक करीत आहेत.

या मार्गावर खालापूर हद्दीत रूंदीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. खालापूर फाटा ते खोपोली या 7 किलोमीटर रस्ता दुपदरीकरणाचे काम ईगल इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. मुळात काळ्या यादीत असलेल्या ठेकेदाराचे काम सुद्धा अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्ताच शिल्लक राहिला नसल्यासारखी अवस्था आहे. शेडवली ते महड फाटा या मुंबईकडे जाणार्‍या मार्गात जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालक त्रस्त होत आहेत.

बैठकीकडे पाठ फिरविणार्‍या रस्ते विकास महामंडळ अधिकार्‍यांच्या कानावर जनतेच्या संतप्त भावना तहसीलदार चप्पलवार यांनी फोनवरून कळविताच संबधित कंत्राटदाराला समन्स बजाविण्यात आले असून, रस्ता दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

खालापूर ते खोपोली रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दररोजचा प्रवास जिवघेणा झाला असून, सुखरूप घरी पोहचू याची खात्री नाही. कंत्राटदार बेफिकीर असून, रस्ते विकास महामंडळ देखील सुस्त आहे. याबाबत मंगळवारची अंतिम मुदत असून, खालापूर तालुक्यातील नागरिकांसह उग्र आंदोलनाची तयारी केली आहे.
-कौस्तुभ जोशी, खालापूर शहर अध्यक्ष, मनसे

First Published on: August 4, 2019 3:09 AM
Exit mobile version