माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी तसंच इतर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहत. अहवाल आल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येणार आहे. मात्र त्यांना कुठल्या तुरुंगात पाठवण्यात येणार आहे, याबाबत अद्याप सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान, जामिनासाठी अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून अर्ज करण्यात येईल. या अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तथापि, जामीन मिळेपर्यत देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ईडीने पाच वेळा समन्स बजावून देखील चौकशीला गैरहजर राहणारे अनिल देशमुख सोमवारी १ नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची तब्बल सडे बारा तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. देशमुख यांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज त्यांची ईडी कोठडी संपत आल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

 

First Published on: November 6, 2021 3:45 PM
Exit mobile version