अण्णा हजारेंच्या जनआंदोलनांचे होणार संग्रहालयात जतन, नव्या पिढीस ठरणार प्रेरणादायी

अण्णा हजारेंच्या जनआंदोलनांचे होणार संग्रहालयात जतन, नव्या पिढीस ठरणार प्रेरणादायी

राज्याला आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी जनआंदोलन करणाऱ्या अण्णा हजारेंच्या ऐतिहासिक माहितीचे संग्रहालयरुपी जतन करण्यात येणार आहे. आपल्या जनआंदोलनांमुळे देशात आणि जगात प्रसिद्धी मिळवलेल्या अण्णा हजारेंचा इतिहासाचे राळेगणसिद्धी येथे संग्राहालय तयार करण्यात येणार आहे. या संग्रहालयात अण्णा हजारेंच्या गाजलेल्या भाषणांबाबत आणि आंदोलनांबाबत सचित्र रुपी माहिती उपस्थित करण्यात येणार आहे. ही माहिती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. प्रथमच अण्णा हजारे यांच्या आंदोलनांचे संग्रहालय तयार करण्यात येत आहे.

अण्णा हजारे यांचा राज्यातील तसेच देशातील राजकारणात आणि भ्रष्टाचारविरोधी आवाज उठवण्यात मोलाचा वाटा आहे. राळेगणसिद्धी या गावाला आदर्श गाव करत अण्णांनी देशाला ग्रामविकासाची दिशा दिली आहे. विकासकामांत भ्रष्टाचाराची गळती लागली असल्यामुळे अण्णांनी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाला १९९० साली राळेगणसिद्धी येथून सुरुवात केली आहे. खेड्यापाड्यातून जनआंदोलनाला सुरुवात करुन अण्णा हजारे यांनी राज्य आणि देशपातळीवर ३० वर्षे अनेक आंदोलन करत जनतेला न्याय मिळवून दिला आहे. अण्णा हजारेंच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे राज्य आणि देशाला माहितीचा अधिकार हा कायदा मिळाला आहे.

लोकपाल कायद्यासाठी अण्णा हजारेंच्या नेतृत्वात दिल्लीतील रामलीला मैदानावर २०११ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची नोंद जगभरात घेण्यात आली यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारविरोधात जनजागृती झाली आहे. अण्णा हजारेंनी केलेल्या संघर्षामुळे आणि आंदोलनांमुळेच देशाला लोकपाल कायदा मिळाला आहे. आंदोलन करत असताना अण्णा हजारेंनी जाहीर सभा आणि दौरे करुन देशात लोकशिक्षणाची जागृती केली. प्रत्येक सभेला अनुदान न घेता आपली झोळी जनतेसमोर फैलावून लोकांनी केलेल्या आर्थिक मदतीने अण्णा हजारेंनी अभियान सुरु ठेवले होते.

आपलं घरदार सोडून केवळ जनतेसाठी एखादा मंदीरात राहणारा माणूस आपले प्राण पणाला लावत असल्याचे पाहून जनतेमध्ये चैतन्य निर्माण झाले. अण्णा हजारेंच्या जनहिताबाबत पुढील पिढीला माहिती मिळावी या हेतूने त्यांच्या आंदोलनांचा इतिहास भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास व स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून एक भव्य संग्रहालय उभारण्यात येत आहे. अशी माहिती अशोक सब्बन आणि ठक्कराम राऊत यांनी दिली आहे.

अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ग्रामविकासाचे सचित्र संग्रहालय यापुर्वी उभारलं आहे. या संग्रहालयाला आतापर्यंत लाखो लोकांनी भेटी दिल्या आहे. यामध्ये आता अण्णांच्या जनआंदोलनांचे संग्रहालय उभं राहणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अण्णांच्या जनआंदोनांची माहिती उपलब्ध होणार आहे.

First Published on: August 4, 2021 8:28 AM
Exit mobile version