संगमनेरमध्ये बाधित महिलेचा मृत्यू

संगमनेरमध्ये बाधित महिलेचा मृत्यू

Another affected woman dies in Sangamner

कोरोनाचे संगमनेरात चार बळी गेले आहेत. रमजान ईदच्या दिवशी या महिलेचा मृत्यू झाला. सातत्याने होणाऱ्या मृत्युमुळे संगमनेरात भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. तर जिल्ह्याबाहेरुन आलेल्या आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सोमवारी रात्री मृत्यू झालेली महिला आपल्या भावासोबत मुंबईच्या विक्रोळीतुन संगमनेरात आली होती. मात्र प्रवासादरम्यान तिला त्रास जाणवु लागल्याने तिची खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. तेथून तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तेथेदेखील तिची प्रकृती खालावत असल्याने तिला तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तिचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले. हा अहवाल करोना बाधित आल्याने संगमनेरातील बाधितांचा आकडा २६ वर गेला होता. मात्र अहवाल येऊन काही वेळ होत नाही तोच या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संगमनेरला हादरा बसला आहे. आत्तापर्यत संगमनेरात पाच जणांचे मृत्यु झाले असून यात एका निगेटिव्ह अहवाल आलेल्या वनकुटे येथील महिलेचादेखील समावेश आहे. तर चार जणांचे मृत्यु करोनाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या महिलेच्या संपर्कातील तिचा भाऊ, खासगी रुग्णालयात तपासणी करणारा कर्मचारी आणि ज्या रुग्णवाहिकेतून तिला नगरच्या रुग्णालयात नेण्यात आले त्या रुग्णवाहिकेचा चालक अशा तिघांचे स्त्राव घेण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. मंगळवारी दुपारी सतरा अहवाल प्रशासनाला मिळाले असून ते सर्व िनगेटिव्ह आहेत. यात नगर शहरातील चार, भिंगार कॅम्पमधील चार, श्रीगोंदा तालुक्यातील तीन, कर्जत तालुक्यातील दोन, श्रीरामपुर, नेवासा, पाथर्डी तालुक्यातील प्रत्येकी एकेकाचा व आैरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील एकाचा समावेश आहे. तर सोमवारी रात्री आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या तिघांपैकी दोनजण मुंबईतुन संगमनेरात आले होते. वरळी येथून एक ६२ वर्षीय बाधित पिंपळगाव लांडगा येथे तर विक्रोळी येथून संगमनेरात आलेल्या मृत महिलेचा समावेश आहे. तर एक बाधित पुण्यातुन श्रीगोंदा फॅक्टरी येथे आला होता, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

आकङेवारी अशी…

नगर जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या : ७५

जिल्ह्याबाहेरील बाधितांची संख्या : १६

आत्तापर्यत बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या : ५४

आत्तापर्यत तपासलेले स्त्राव : २०६५

निगेटिव्ह आलेले स्त्राव : १९२२

पुन्हा पॉझिटिव्ह आढळेले रुग्ण : १०

निष्कर्ष न काढता आलेले नमुने : १५

फेटाळले गेलेले नमुने : २५

नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेले रुग्ण : २६

नाशिकमध्ये उपचार सुरु असलेले रुग्ण : ३

दगावलेले रुग्ण जिल्ह्यातील ८ व जिल्ह्याबाहेरील  : १

First Published on: May 26, 2020 5:21 PM
Exit mobile version