बायको सांगून घटस्फोटासाठी कोर्टात उभी केली दुसरीच बाई आणि….

बायको सांगून घटस्फोटासाठी कोर्टात उभी केली दुसरीच बाई आणि….

नाशिक : राष्ट्रीय लोकअदालतीत घटस्फोटासाठी पत्नीने दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी पतीने दुसर्‍याच महिलेला पत्नी असल्याचे भासविल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीसह न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, द्वारका परिसरात राहणार्‍या ३५ वर्षीय पीडित महिलेचे संशयित राहुल दत्तू सानप याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. पीडित महिला कौटुंबिक वाद निर्माण झाल्याने २०१९ पासून संशयित राहुलपासून विभक्त राहत आहे. तिने घटस्फोटासाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पती राहुलविरोधात घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता.

जून-२०२२ मध्ये महिलेसह तिच्या वकिलाने न्यायालयाच्या पोर्टलवर दाव्याच्या तारखेचा शोध घेतला असता त्यांना दावा निकाली निघाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ न्यायालयाकडून त्यासंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्र त्यांच्या हाती आल्यानंतर त्यात दावा मागे घेण्यासाठीच्या पीडित महिलेची व त्यांच्या वकिलाची स्वाक्षरी बनावट असल्याचे निदर्शनास आले.

संशयित राहुल सानप याने ७ मे २०२२ रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत घटस्फोटाचा दावा केला होता. त्यावेळी संशयित राहुल सानप याने न्यायालयासमोर दुसर्‍याच महिलेला पत्नी म्हणून उभे केले. ती महिला पत्नी असल्याचे भासवून सानप याने घटस्फोटाचा दावा मागे घेतला. त्यावर पीडित महिलेच्या व त्यांच्या वकिलाच्या बनावट स्वाक्षर्‍या केल्या. त्यातून त्याने पीडित महिलेसह न्यायालयाचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खैरनार करत आहेत.

First Published on: May 5, 2023 2:00 PM
Exit mobile version