LockDown : चाकरमान्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था करा- आशिष शेलार

LockDown : चाकरमान्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था करा- आशिष शेलार

राज्याच्या विविध भागातून विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हयातून कामानिमित्त मुंबई, पुण्यात आलेल्या श्रमिक, चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा, अशी विनंती भाजपा आमदार आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे राज्याअंतर्गत अनेक श्रमिक, कामगार अडकून पडले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य तपासणी करून अशा श्रमिकांना तातडीने त्यांच्या मूळ गावी सोडल्यास त्यांची होणारी कुचंबणा थांबेल आणि गैरसाय कमी होईल. यातील अनेक श्रमिक, मजूर हे जिल्ह्यांच्या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्नपाण्याच्या सुविधेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, असे शेलार यांनी पत्रात म्हटले आहे.

विदर्भ, मराठवाडा, खांदेश, पश्चिम महाराष्ट्रातील  विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्टयातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्हयातील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त आलेले चाकरमानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात अडून पडले आहेत. यातील बहुसंख्य जण छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहत असून त्यांच्य आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे सरकारने चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठविण्याची व्यवस्था तातडीने करावी. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना आशीष शेलार यांनी केली आहे.

First Published on: May 5, 2020 6:07 PM
Exit mobile version