अखेर अरविंद सावंतांचे पुनर्वसन; संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड

अखेर अरविंद सावंतांचे पुनर्वसन; संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून अवतरलेल्या नवीन राजकीय पर्वात शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सावंतांचे पुनर्वसन कसे करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावंत यांचे पुनर्वसन करीत त्यांना थेट मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. सावंत यांची निवड राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी करण्यात आली.

नियुक्तीचे पत्रक जाहीर

केंद्र सरकार दरबारी राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याची गंभीर दखल घेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व खासदरांची बैठक घेतली होती. या बैठकीत राज्य सरकार केंद्रातील प्रश्नांसंदर्भात एका संसदीय समितीची निर्मिती करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सावंत यांची निवड करून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुक्तीचे पत्रक जाहीर केले आहे.

सावंतांचे कार्यालय दिल्लीत

या निर्णयानुसार आता अरविंद सावंत यांना मंत्र्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतील. त्यांचे कार्यालय नवी दिल्लीत असणार आहे. कामकाजासाठी शासकीय वाहन, कार्यालयीन आणि निवासी दूरध्वनी, आवश्यक तो कर्मचारी वर्ग, दैनंदिन बैठक भत्ता, वैद्यकीय खर्च आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. दरम्यान, ही नियुक्ती झाल्यानंतर सावंत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.


वाचा काय झालं होतं – अखेर शिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांनी दिला राजीनामा
First Published on: February 14, 2020 9:34 PM
Exit mobile version