अर्धनग्न होताच रूग्णालयाने परत केले दिड लाख रूपये

अर्धनग्न होताच रूग्णालयाने परत केले दिड लाख रूपये

रूग्णांच्या उपचारानंतर डिपॉझिटपोटी भरलेली दिड लाखाची रक्कम परत न देणार्‍या वोक्हार्ट रूग्णालयाच्या विरोधात ऑपरेशन हॉस्टिपल मोहिमेंतर्गत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रूग्णालयाच्या कार्यालयासमोर कपडे काढत कपडे विका आणि पैसे वसूल करा असा पवित्रा घेत आंदोलन छेडले. आंदोलनानंतर रूग्णालय प्रशासनाने रूग्णाच्या नातेवाईकांना डिपॉझिटचे पैसे परत देण्याची तयारी दर्शवल्यानंतर मोहिम फत्ते झाली. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांना मुंबईनाका पोलीसांनी ताब्यात घेतले.

सिन्नर येथील रहिवासी अमोल जाधव यांनी आपल्या आई, वडीलांना कोरोना उपचारासाठी नाशिकच्या वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले. चौदा दिवसांच्या उपचारापोटी त्यांनी सुमारे दहा लाख रूपयांचे बिल अदा केले. रूग्णांना दाखल करतांना त्यांनी दिड लाख रूपये डिपॉझिटही भरले. रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जाधव यांनी आपली डिपॉझिटची रक्कम परत मिळवण्यासाठी हॉस्पिटलकडे पाठपुरावा सुरू केला. जाधव हे एका कंपनीत सात हजार रूपये पगारावर काम करतात. डिपॉझिट भरण्यासाठी व्याजाने पैसे आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वारंवार हेलपाटे मारूनही रूग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. अखेर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्याकडे तक्रार करत मदत मागितली. भावे यांनी ऑपरेशन हॉस्पिटल मोहिमेंतर्गत रूग्णालयात आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी अंगावरचे कपडे काढत जोपर्यंत डिपॉझिटची रक्कम परत दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला. अखेर अर्धातासानंतर रूग्णालय प्रशासनाने डिपॉझिटची रक्कम परत करण्याची तयारी दर्शवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर भावे यांना मुंबईनाका पोलीसांनी ताब्यात घेतले.

रूग्णालयाच्या मनमानीविरोधात संताप
हे आंदोलन फेसबुकव्दारे लाईव्ह करत रूग्णालयाची पोलखोल करण्यात आली.रूग्णालयाच्या या अमानवी वागणुकीविषयी तीव्र संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान पोलीसांनी आंदोलनकर्ते जितेंद्र भावे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले असता भावेंच्या समर्थनार्थ मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर मोठया संख्येने नागरिक जमले होते. भावे यांना तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. यावेळी नाशिककरांनी रूग्णालयांच्या या मनमानीविरोधात संताप व्यक्त केला.

 

वोक्हार्ट रूग्णालयात बिलावरुन रुग्णाचे नातेवाईक अमोल जाधव व जितेंद्र भावे यांनी डॉक्टरांशी वाद घालत आंदोलन केले. याप्रकरणी संबंधित डॉक्टरसह अमोल जाधव आणि जितेंद्र भावे यांना ताब्यात घेतले आहे. दोघांच्या तक्रारी ऐकून घेतल्या असून, कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका

First Published on: May 25, 2021 9:20 PM
Exit mobile version