Ashadhi Wari 2021 : यंदाच्या आषाढी वारी सोहळ्य़ावर बंदी नको निर्बंध मान्य- वारकरी

Ashadhi Wari 2021 : यंदाच्या आषाढी वारी सोहळ्य़ावर बंदी नको निर्बंध मान्य- वारकरी

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी सोहळ्यावर कोरोनाचे ग्रहण कायम असल्याचे पाहायला मिळतेय. गेल्यावर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणले गेले. परंतु यंदा मात्र निर्बंध घालत पायी पालखी सोहळा सुरु करावा या मागणीसाठी वारकरी संप्रदाय अधिक आक्रमक झाले आहेत. कोरोनाची निर्बंध चालतील पण बंदी नको अशी भूमिका वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या आषाढी वारी सोहळ्य़ावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढतील अशी अपेक्षाही वारकरी संप्रदायाने व्यक्त केली आहे.

यंदा १ जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा असून २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. त्यानंतर २० जुलै २०२१ रोजी आषाढी एकादशी आहे. परंतु राज्यातील कोरोनाचे संकट कमी झाले असून दररोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यात पालखी सोहळा फिरणाऱ्या सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्येही कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याने यंदाचा आषाढी पालखी सोहळा कसा घ्यायला असा प्रश्न राज्य सरकारसमोर निर्माण झाला आहे. मात्र यावर वारकरी संप्रदायाने यंदा मर्यादित स्वरुपात वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्याला परवानगी द्या. यावेळी आम्ही सर्व कोरोनाचे नियम पाळून पायी पालखी सोहळा पंढरपूरात आणू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्व वारकरी संप्रदायाचे डोळे उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीच्या निर्णयाकडे लागले आहे.

उद्या होणार महत्त्वाची बैठक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या म्हणजेच शुक्रवारी राज्यातील मानाच्या ९ पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त आणि मानकऱ्यांची पुण्यात एक बैठक आयोजित केली आहे. यंदा २० जुलै २०२१ रोजी साजरा होणार यंदा आषाढी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे. मागील वर्षी संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत चांगावटेश्वर व माता रुक्मिणी राज्यातील अशा मानाच्या ९ पालख्यांना एसटी बसने वारीला शासनाने परवानगी दिली होती.

आषाढी पालखी सोहळे २०२१

(मानाचे ७ पालखी सोहळे असून शासनाने वाढवलेले २ असे एकूण ९ पालखी सोहळे वेळापत्रक)

१) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलै २०२१

२) संत एकनाथ महाराज पालखी सोहळा १ जुलै २०२१

३) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, २ जुलै २०२१

४) संत सोपानकाका पालखी सोहळा, ६ जुलै २०२१

५) संत चांगावटेश्वर पालखी सोहळा, ६ जुलै २०२१

६) संत नामदेव महाराज पालखी सोहळा १९ जुलै २०२१

७) रुक्मिणी देवी पालखी सोहळा, १४ जून २०२१

८) आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा , १४ जून २०२१

९) श्री क्षेत्र श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा २४ जून २०२१


 

First Published on: May 27, 2021 5:04 PM
Exit mobile version