इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द! पादुका हेलिकॉप्टर किंवा वाहनाने नेणार!

इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द! पादुका हेलिकॉप्टर किंवा वाहनाने नेणार!

प्रातिनिधीक फोटो

राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी एकत्र येणार असलेल्या पंढरीच्या वारीचं काय होणार? यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावर आता पडदा पडला असून इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. थेट आषाढी एकादशीच्याच दिवशी ज्ञानोबा माऊलींच्या पादुका पंढरपूरला हेलिकॉप्टर किंवा वाहनाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील असा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात वारकरी भक्तगणांसाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातलं दर्शन २४ तास ऑनलाईन पद्धतीने होत राहील, असं देखील जाहीर करण्यात आलं आङे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहनीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि मंदिर समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालत निघतात. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणहून या पालख्या निघतात. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज या सहा प्रमुख पालख्या असतात. यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येत ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषात पंढरपूरात दाखल होतात. मात्र, इतका मोठा समुदाय एकत्र आल्यामुळे कोरोनाचं मोठ्या प्रमाणावर संक्रमण होऊ शकतं हा धोका लक्षात घेता यंदा वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच वारी रद्द होत आहे.

दरम्यान, सहा प्रमुख पालख्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्या हेलिकॉप्टर किंवा वाहनाच्या माध्यमातून पंढरपुरात आणण्यात येतील. या पालख्यांसोबत प्रत्येकी ५ लोकं असणार आहेत. पंढरपुरात संत नामदेव महाराज यांच्या पालखी त्यांचं स्वागत करतील.

First Published on: May 29, 2020 6:08 PM
Exit mobile version