‘खायला नाही अन्न आणि म्हणतात योग करा’ – अशोक चव्हाण

‘खायला नाही अन्न आणि म्हणतात योग करा’ – अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली. ”देशात भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत. गोर-गरीब लोकांना दोन वेळचे अन्न मिळत नाहीये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला योग करायला सांगत आहेत”, असे उद्गार अशोक चव्हाण यांनी काढले. औरंगाबाद शहर व ग्रामीण जिल्हा बुथ कमिटी समन्वयकांच्या बैठकीत आज बोलताना चव्हाण म्हणाले, ”महागाई, शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफी, वाढलेला जातीय तणाव ही संकटे आज देश आणि राज्यासमोर उभी आहेत. देशातली शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, दलित अल्पसंख्यांक असे सर्वच घटक संकटात आहेत. मात्र, त्यांना संकटातून बाहेर काढण्याऐवजी पंतप्रधान योग करायला सांगत आहेत.”

शेतकरी कर्जमाफीवरुनही टीका

मोदी सरकारवर निषाणा साधत चव्हाण म्हणाले, ”राज्यात १५ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. लोक किडे-मुंग्यांप्रमाणे मरत आहेत. मात्र सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा एक वर्षापूर्वी सरकारने केली होती पण अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. शेतक-यांना संकटात टाकणा-या या सरकारला याचा जाब सरकारला विचारला पाहिजे.” कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले, ”शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांसमोर गावागावात जाऊन मोर्चे काढा. एकीकडे नीरव मोदी, विजय माल्यासारखे उद्योगपती कोट्यावधींचे कर्ज घेऊन विदेशात पळून गेले आणि इकडे शेतकऱ्यांना मात्र कर्ज मिळत नाही. याविरुद्ध आवाज उठवायला हवा.”

‘योग प्रदर्शनाच्या दिव्याखाली काळाकुट्ट अंधार’

तर दुसरीकडे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनीही योगाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली. ‘सरकारच्या डोळे दिपवणा-या योग प्रदर्शनाच्या दिव्याखाली काळाकुट्ट अंधार आहे’, असा घणाघाती आरोप करत सावंत यांनी महाराष्ट्र प्रदेश राज्य सरकारकडून योगाच्या प्रचारासाठी झालेल्या खर्चाची आकडेवारी जाहीर केली. याबाबत आकडेवारी जाहीर करतेवेळी सावंत म्हणाले, ”केंद्र सरकारच्या आयुष विभागाकडून आलेल्या एकंदरीत अनुदानातील केवळ २०.४ लक्ष रूपये एवढा निधी २०१५-१६ या वर्षांत राज्य सरकारतर्फे खर्च करण्यात आला. २०१६-१७ साली या आयुष विभागाकडून राज्याला कोणाताही निधी दिला गेला नाही त्यामुळे योगावर खर्च होण्याचा प्रश्नच नाही. २०१७-१८ साली राज्य सरकारने १ कोटी १४ लक्ष ४ हजार रूपये एवढाच निधी खर्च केला आहे.” ‘यातूनच योगासंदर्भातले भाजप सरकारचे ऊतू जाणारे प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम असून त्या अनुषंगाने केलेली इव्हेंटबाजी दिखाव्याचीच आहे’, असंही सावंत म्हणाले.

लोकांची दिशाभूल करण्यासाठी योगा

‘योग प्रेमाचा हा उमाळा केवळ दिखाव्याचा असून राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या, जनतेचा आक्रोश सर्व आघाड्यांवरील अपयश सामाजिक सलोख्यावर केलेला आघात, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था व सर्वच स्तरावर बोकाळलेला भ्रष्टाचार आदी समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा यांचा उद्देश असल्याचे’ सावंत म्हणाले.

First Published on: June 21, 2018 9:17 PM
Exit mobile version