रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए, ईडीकडून चौकशी करा, अशोक चव्हाण यांची मागणी

रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए, ईडीकडून चौकशी करा, अशोक चव्हाण यांची मागणी

संग्रहित छायाचित्र

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. याचा फायदा काही नफेखोर घेत आहेत. रेमडेसिविरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची केंद्र सरकारने एनआयए आणि ईडीकडून चौकशी करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी केली. रेमडेसिविरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे रेमडेसिविर हे कोरोनावरील रामबाण औषध नाही. पण विशिष्ट कालावधीत हे औषध दिल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने हे औषध कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे, याची स्पष्टोक्ती करून त्याचे गरजेनुसार सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात वितरण करावे, अशी सूचनाही चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर काम करते आहे. या महामारीला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी मिळून संयुक्तिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. परंतु, केंद्र सरकार अनेकदा बेजबाबदारपणे वागताना दिसून आले आहे. भाजपचे अनेक नेते आणि केंद्रीय मंत्री सातत्याने राजकीय हेतूने प्रेरीत विधाने करीत आहेत. त्यातून त्यांची सहकार्याची नव्हे तर राजकारणाचीच भूमिका दिसून येते, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

कोरोनावरून महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. गुजरातमध्ये रेमडेसिविरचा काळा बाजार करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या एका संचालकाला रंगेहात अटक झाली. त्याच कंपनीच्या अन्य एका संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशी करण्यासाठी बोलावले असता भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते आणि अनेक आमदार पोलीस ठाण्यात धावून जातात. पोलीस चौकशीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचे असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

First Published on: April 19, 2021 7:55 PM
Exit mobile version