…तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, तसे आदेश आहेत – अशोक चव्हाण

…तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, तसे आदेश आहेत – अशोक चव्हाण

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांसोबतच सामान्य जनतेमधूनही या सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता याच सरकारमधले एक मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक वक्तव्य करून नवी चर्चा सुरू केली आहे. नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘सोनिया गांधींचे आम्हाला आदेश’

नांदेडमध्ये बोलताना अशोक चव्हाणांनी तीन पक्षांचं मिळून सरकार कसं अस्तित्वात आलं, ते सांगितलं. ‘सरकार स्थापन करण्यापूर्वी आमच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे, असं आम्हाला बजावलं होतं. शिवसेनेकडून ते लिहूनच घ्या असं देखील सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही सोनिया गांधींचा संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला. तेव्हा उद्धव ठाकरेंनी देखील आम्हाला संविधानाच्या चौकटीतच राहून सरकार चालवण्याचा शब्द दिला. जर तसं झालं नाही, तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या सूचना आम्हाला सोनिया गांधींनी दिल्या आहेत’, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

‘मला २ पक्षांचं सरकार चालवण्याचा अनुभव’

दरम्यान, यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी तीन पक्षांच्या सरकारवरून केलेल्या विनोदावर सभागृहात हशा पिकला. ‘आमचं क्षेत्र सिनेमासारखं आहे. सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो. पण सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. तसाही हल्ली मल्टिस्टाररचा जमाना आहे. मला दोन पक्षांचं सरकार चालवण्याचा अनुभव आहेच. आता त्यात अजून एक पक्ष वाढला इतकंच’, असं अशोक चव्हाणांनी म्हणताच सभागृहातून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली.

First Published on: January 27, 2020 10:52 AM
Exit mobile version