पेणमधील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या?

पेणमधील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या?

तालुक्यातील वरसई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्येचा, घातपाताचा की शासकीय अनास्थेने घेतलेला बळी, असे वेगवेगळे सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि एका शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शिल्पा नाग्या शिद (१6) असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती पेण तालुक्यातील तांबडी गावची रहिवासी आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिल्पाचा मृतदेह आश्रमशाळेपासून चार किलोमीटर अंतरावर जावळी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तत्पूर्वी, शिल्पा हिला बुधवारी सकाळी 10 वाजता दोघी मैत्रिणींनी शाळेच्या वसतीगृहातून बोलावून नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयाचे धुके तयार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन नाक्ते आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत जबाबदार कर्मचार्‍यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी मुंबईत जे. जे. रुग्णालयात रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून या प्रकरणी चौकशी करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष संतोष गवस यांनी केली आहे. आश्रमशाळेतील मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही अधीक्षक, अधीक्षिका, तसेच मुख्याध्यापक यांची असल्याने त्यांच्यासह इतर जबाबदार कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. तर या शासकीय आश्रम शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल नाक्ते यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. गवस आणि नाक्ते यांनी सहकार्‍यांसह शुक्रवारी शिद परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

२ लाखांची मदत मिळावी
दुर्दैवी शिल्पा शिद हिच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. अधीक्षिका दुर्गा धंदरे या सुट्टीवर असल्याने त्यांचा पदभार प्राथमिक शिक्षिका उषा पवार यांच्याकडे होता. मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापक डी. जी. पाटील, शिक्षिका पवार आणि अधीक्षिका धंदरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
-शशिकला अहिरराव, आदिवासी प्रकल्प अधिकारी, पेण

First Published on: February 8, 2020 6:51 AM
Exit mobile version