विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्यांमध्ये चुरस

विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्यांमध्ये चुरस

महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे राजीनामा देण्यावर ठाम असल्याचं सांगितल्यानंतर काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवं नाव शोधायला सुरुवात केली. काँग्रेसच्या हायकमांडमध्ये यावर चर्चा देखील झाली. चर्चेअंती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विद्यमान विधानसभा अध्यक्ष आणि विदर्भातील काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांचं नाव जवळ पास निश्चित झालं आहे. नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद सोडावं लागणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मराठवाड्यातील आमदार सुरेश वरपुडकर, आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं कळतंय.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद आलं. त्यानंतर काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने विरोध केला. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होता आलं नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद याचा पुरस्कार करत काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी वा चेहरा शोधा अशी मागणी हायकमांडकडे केल्याचं बोललं जातं. तथापि, बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद, महसूल मंत्रीपद आणि विधीमंडळ गटनेतेपद आहे. त्यामुळे पक्षातील नाराजांच्या भावना लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष पदावरुन पाय उतार होण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या. दरम्यान, नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी नवं नाव शोधावं लागणार आहे. यासाठी काँग्रेसमध्ये चुरस देखील सुरु झाली आहे.


हेही वाचा – पवार, उद्धव, राज, फडणवीस एकाच मंचावर; शनिवारी राजकीय जुगलबंदी रंगणार


 

First Published on: January 21, 2021 11:53 AM
Exit mobile version