जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडवून चोरट्यांनी लुटले एटीएम

जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडवून चोरट्यांनी लुटले एटीएम

सचिन बनसोडे, राहता

जिलेटिनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

लोणी खुर्दमधील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे. रविवारी ( दि.१० ) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून हे एटीएम फोडल्याची फोडले. त्यानंतर त्यातील रोकड लंपास केली. चोरट्यांनी आधी एटीएमशेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या, तसेच सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांनी घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र कड्या बाहेरुन लावलेल्या असल्याने चोरट्यांना लुटीसाठी वेळ मिळाला.

एटीएम फोडल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याठिकाणी ठसे तज्ज्ञ व डॉग स्कॉडच्या सहाय्याने तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान लोणी पोलिसांपुढे आहे.

First Published on: October 10, 2021 11:47 AM
Exit mobile version