जिथे भाजप तिथे दलित आणि महिलांवर अत्याचार, काँग्रेसची टीका

जिथे भाजप तिथे दलित आणि महिलांवर अत्याचार, काँग्रेसची टीका

काँग्रेसचे भाजपविरोधात आंदोलन

देशात जिथे भाजप सरकार तिथे दलित महिला आणि अल्पसंख्यांकावर अत्याचार ही सद्यस्थिती असल्याची जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी केली. भाजपशासित राज्यांमध्ये महिला आणि दलितांवरील अत्याचारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. राज्या राज्यातील भाजप सरकारे महिला, दलित आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. भाजपाशासित राज्यांमध्ये महिला, दलित आणि अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत, असा आरोपही थोरात यांनी केला.

भाजपशासित राज्यांमधील महिला आणि दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेसच्यावतीने आज महिला, दलित अधिकार दिवस पाळण्यात आला. चैत्यभूमी दादर येथे बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात सत्तेवर आल्यापासून महिला आणि दलितांवरील अत्याचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संघाच्या इशा-यावर चालणा-या केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजप सरकारे महिला, दलित आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणा-यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने केला. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरु केल्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला प्रकरण दडपता आले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर चालणा-या भाजपला पुन्हा वर्णव्यवस्था आणायची आहे पण काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही, असे थोरात म्हणाले.

ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, त्या राज्यात महिलांना आणि मागासवर्गीयांना सन्मान मिळत नाही. भाजपला मनुवाद प्रिय आहे. मागासवर्गीय पुढे गेलेले त्यांना आवडत नाही. उत्तरप्रदेशमध्ये हाथरस सारखी घटना होते आणि पंतप्रधान त्यावर काहीही बोलत नाहीत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,अशी टीका एकनाथ गायकवाड यांनी यावेळी केली.

First Published on: November 4, 2020 7:46 PM
Exit mobile version