मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे लातूरमध्ये एका उच्च शिक्षीत तरूणाने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी १० सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. किशोर कदम (वय २५) बोरगाव येथील तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. परंतु आरक्षणाला स्थगिती दिल्याने हा तरुण निराश झाला. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे हा तरुण निराश झाला होता. आरक्षण रद्द झाल्यामुळे माझे जीवन अंधकारमय झाले असल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी या तरुणाने लिहिली आहे. दरम्यान, या तरुणाला उपचारासाठी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेलं आहे.

दरम्यान, आज क्रांती मोर्चा समन्वयकांची नाशिकमध्ये बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आंदोलनाची सुरुवात नाशिकमधून सुरु होण्याची चिन्ह आहेत.

First Published on: September 10, 2020 3:26 PM
Exit mobile version