धक्कादायक! औरंगाबादमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच टोळक्यांकडून मारहाण

धक्कादायक! औरंगाबादमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच टोळक्यांकडून मारहाण

पोलिसांवर हल्ला

सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे लोकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. लोकांनी घरी बसावे आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा, इतकेच शासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी देशात अत्यावश्यक सेवा अहोरात्र काम करत आहेत. राज्यातही जागोजागी पोलिसांचे कडे पहारे आहेत. मात्र दिवसरात्र रस्त्यावर उभं राहून ड्युटी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण होत असल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. बाईकवर फिरणाऱ्या मुलांच्या टोळक्याला अडवल्यामुळे त्या टोळक्यांनी पोलिसांना मारहाण केल्याने सर्व स्तरातून या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा – धोक्याचा इशारा; इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक

नेमकं काय घडलं

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधिक रुग्ण आढळल्यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारपासून पोलिसांचा पहारा आणखीनच कडक केला आहे. त्यांनी सायंकाळी ७ ते पहाटे ७ वाजेपर्यंत संचारबंदी कडक करत पोलिसांना त्याची अंमलबजावणी करणे सक्तीचे केले आहे. मात्र गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय येथील अण्णाभाऊ साठे चौकात बाईकवर फिरणाऱ्या टोळक्यांना तेथील पोलिसांनी अडवले असता त्या टोळक्यांनी त्यांना उडवउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांनी टोळक्यांना मारण्यास सुरूवात केली. या उलट त्यातील मुलांनीही पोलिसांच्याच हातातील काठी हिसकावून घेत पोलिसांना मारहाण केली. शिवाय जाब विचारल्याच्या रागात धक्काबुक्कीही केली. दरम्यान, पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे आले. तर काहींनी हा सर्व प्रकार मोबाईमध्ये शूट करून घेतला. पोलिसांना मारून ती टोळकी तिथून निघून गेली. या घटनेत काही पोलीस जखमी झाले आहेत. तर या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात त्या टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: April 9, 2020 3:24 PM
Exit mobile version