वडिलांच्या उपचारांसाठीचे २० हजार हरवले; रिक्षावाल्याने परत दिले!

वडिलांच्या उपचारांसाठीचे २० हजार हरवले; रिक्षावाल्याने परत दिले!

रिक्षावाल्यांचा उद्धटपणा आणि त्यांची मदत करण्याची वृत्ती याविषयी अनेक नकारात्मक बातम्या आपण रोज ऐकत आणि पाहात असतो. त्यामध्ये तथ्य देखील असते. पण त्याव्यतिरिक्त अनेक रिक्षाचालक हे प्रामाणिकही असल्याचीही अनेक उदाहरणे समोर येत असतात. तशीच एक घटना पुण्यातल्या निगडीमध्ये घडली आहे. आपल्या वडिलांच्या उपचारांसाठी २० हजार रुपये घेऊन जात असलेल्या महिलेचे पैसे रिक्षामध्येच राहिले. त्यामुळे ती प्रचंड तणावामध्ये आली होती. मात्र, अचानक तिला निगडी पोलिसांचा फोन आला आणि पैसे सापडल्याचं त्यांनी तिला सांगितलं. विशेष म्हणजे हे पैसे एका रिक्षावाल्यानेच आणून दिल्याचं पोलिसांनी या महिलेला सांगितलं.

..आणि रिक्षातच राहिले २० हजार

प्राजक्ता गोळे असं या महिलेचं नाव आहे. प्राजक्ता यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्या मूळ ठाणे-मुंबई येथील असून पिंपरी-चिंचवडमध्ये वडिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परिस्थिती नाजूक असल्याने शहरातील नातेवाईकांकडून उसने २० हजार रुपये घेऊन प्राजक्ता रूपीनगर येथे जात होत्या. त्यांना तातडीने वडिलांना घेऊन कर्नाटक येथे जायचे होते. तिथे अर्धांगवायूवर उपचार होतो असे त्यांना समजले होते. त्यामुळेच त्या घाईत होत्या. तेव्हा, चिंचवड ते टिळक चौक निगडी पर्यंत रिक्षाने प्रवास केला. वडिलांकडे जाण्याच्या घाईत प्राजक्ता यांच्याकडून २० हजार रुपये असलेली बॅग रिक्षातच राहिली. आपल्याकडे बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पुन्हा टिळक चौकातील रिक्षा स्टँडवर गेल्या. मात्र, तोपर्यंत रिक्षा चालक महेंद्र हे निघून गेले होते. त्यांचा शोधही घेतला. पण ते न सापडल्याने पोलिसांची मदत घेतली. वस्तू गहाळ झाल्याची निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

रिक्षाचालकाने पैसे घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले

दरम्यान, रिक्षा चालक महेंद्र निवृत्ती अरवडे यांनी संबंधित पैसे असलेली बॅग आणि महत्वाची कागदपत्रे घेऊन निगडी पोलीस ठाणे गाठले. संबंधित घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांना देण्यात आली. निगडी पोलिसात तक्रार नोंद असल्याने प्राजक्ता यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. पैसे मिळाल्याचे पाहून प्राजक्ता यांना आनंद झाला. मात्र, त्या बाहेरगावी असल्याने त्यांनी भाऊ सुभाष गोळे यांना निगडी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समक्ष २० हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग महेंद्र यांनी पोलिसांकडे सुपूर्द केली. यावेळी रिक्षा चालक महेंद्र यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

First Published on: September 8, 2019 3:46 PM
Exit mobile version