अयोध्येला निघालेली रेल्वे थांबवली, शिवसेना नेते – कार्यकर्त्यांमध्ये राडा

अयोध्येला निघालेली रेल्वे थांबवली, शिवसेना नेते – कार्यकर्त्यांमध्ये राडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी नाशिक आणि ठाण्यातून दोन विशेष रेल्वेगाड्या अयोध्येसाठी रवाना झाल्या होत्या. परंतु त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, अयोध्येला निघालेल्या रेल्वेत शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाशिकमधून घेऊन निघालेल्या रेल्वेत शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये बोगीत बसण्यावरून मोठा वाद झाला आहे. त्यामुळे मनमाड जँक्शनवर रेल्वे ३० मिनिटं थांबवण्यात आली. वाद निवळल्यानंतर रेल्वे पुन्हा निघाली. परंतु नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद झाल्यामुळं चैन खेचून दोनदा ट्रेन थांबवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर देखील चालत्या ट्रेनमध्ये शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरुच होता. त्यामुळं आता अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्यामुळे शिंदे गट अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, रामभक्तांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी राम मंदिर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी आणि काँग्रेस या सर्व विषयांवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.


हेही वाचा : ‘रात गई, बात गई’ असं म्हटलं तरच एकत्र येता येईल, चंद्रकात पाटलांचे ठाकरेंना संकेत


 

First Published on: April 7, 2023 10:17 PM
Exit mobile version