‘बाळा तू मला माझी आई दिली’; ‘या’ युवकाने बनवलेले पोट्रेट पाहून ममताताई झाल्या भावूक

‘बाळा तू मला माझी आई दिली’; ‘या’ युवकाने बनवलेले पोट्रेट पाहून ममताताई झाल्या भावूक

नाशिक : अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या आणि अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणार्‍या दिवगंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ ऊर्फ माई यांचे पाच फुटाचे रेखाटलेले पोट्रेट ममता सिंधुताई सपकाळ यांना दाखवले. तेंव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, बाळा तु माझी आई प्रत्यक्षात दिली. हे त्यांचे बोलणे ऐकून स्वत: पोट्रेट तयार केल्याचा विलक्षण आनंद झाला. नाशिकच्या कलाकाराने माईंचे काढलेले सर्व पोट्रेट सर्व पोट्रेट मांजरी (जि.पुणे) येथील सन्मती बाल निकेतन संस्थेत कायमस्वरुपी ठेवण्यात आले आहेत, याचा अभिमान आहे , अशी माहिती चित्रकार प्रणव सातभाई याने दै. आपलं महानगर’शी बोलताना दिली.

प्रणवने कोरोनाकाळात डिजिटल पेटिंगाविषयी जाणून एक वर्षात एक हजारहून अधिक पोट्रेट साकरत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याचे मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या बी. व्होक मासमीडियाचे शिक्षण झाले आहे. आता तो मास्टर फिल्ममेकिंगचे शिक्षण घेत आहे. त्याच्या कलेची दखल घेत वर्ल्डवाईड बूक ऑफ रेकॉर्ड्सने त्याची निवड करून प्रमाणपत्र, पदक, स्मार्ट कार्ड देत सन्मान केला आहे. त्याने वर्षभरात तब्बल एक हजार डिजिटल पेंटिंग्ज साकारल्या आहेत. प्रणव पाच वर्षांपासून शिक्षणासोबत फोटोग्राफी करतो आहे. त्याने संगणकावर सोशल मीडियाचा उपयोग करून हातात डिजिटल ब्रश घेतला. संगणक, ग्राफिक्स टॅब्लेट, स्टाइलस आणि सॉफ्टवेअरद्वारे डिजिटल उपकरणांचा वापर करून वॉटर कलर, इम्पॅस्टो पारंपरिक चित्रकला तंत्र लागू केले जाते. त्याने डिजिटल ब्रश हातात घेत सिंधुताईंचे २० हून अधिक पोट्रेट रेखाटले आहेत.

पहिल्यांदा ममता सिंधुताई सपकाळ यांचे पोट्रेट तयार केले. ते सोशल मीडियावर अपलोड केले. ते पोट्रेट ममताताईंना खूप आवडले. त्यानंतर त्या पोट्रेटची फ्रेम तयार करून ते मांजरी येथील आधाराश्रमात ममताताईंना भेट दिले. त्यावेळी अनाथश्रमातील मुले पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे ठरविले. ममताताईंशी चर्चा केल्यानंतर माईंची अनेक पोट्रेट तयार करण्याची कल्पना सुचली. माईंचे पोट्रेट आणि त्यांचे त्याचे पुण्यात प्रदर्शन करू या का, असे ममताताईंना विचारले असता त्यांना आश्रू अनावर झाले. त्यांचा होकार मिळताच पुण्यात १२ ते १४ नोव्हेंबर २०२२ या काळावधीत माईंच्या पोट्रेटचे चित्रप्रदर्शन भरविले. त्यास पुणेकरांनी प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, अभिनेत्री पंडीत यांनी सिंधुताई सपकाळ यांच्याकडे असलेली शाल देत सन्मान केला. हा क्षण आनंददायी होता.

प्रदर्शनानंतर तयार केलेल्या पाच ते सात फुटांच्या पोट्रेट करायचे काय, असा प्रश्न ममताताईंना विचारला असता त्यांनी प्रदर्शन झाल्यानंतर सर्व पोट्रेट माईंच्या आश्रमात लावले जाणार आहेत, असे सांगितले. हे ऐकूण सुखद धक्काच बसला. माईच्या आश्रमात स्वत: तयार केले पोट्रेट लागले जाणे, हा आयुष्यातील सर्वांत मोठा व विश्वविक्रमापेक्षा मोठा आनंद असल्याचे प्रणवने सांगितले. आश्रमात या पोट्रेट उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माईंना मिळालेले सन्मापत्र आश्रमात ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पोट्रेट लावण्यात आले आहेत,असेही प्रणवने सांगितले.

First Published on: January 4, 2023 8:51 AM
Exit mobile version