बच्चू कडू आणि मी एकत्रच आहोत, मी माझे शब्द मागे घेतो; रवी राणांकडून दिलगिरी व्यक्त

बच्चू कडू आणि मी एकत्रच आहोत, मी माझे शब्द मागे घेतो; रवी राणांकडून दिलगिरी व्यक्त

‘आम्ही दोघेही या सरकारसोबत आहेत. जेव्हा एखाद्या विचारामध्ये मतभेद होते, त्यावेळी बोलता-बोलता तोंडातून निघालेले आहे. गुवाहटीच्या संदर्भात असेल किंवा आज मुख्यमंत्री असतील आणि इतर अपक्ष आमदार हे आमचे सहकारी आहेत. त्यामुळे काही वाक्य निघाले असेल, तर मी माझे वाक्य मागे घेत आहे’, अशा शब्दांत अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोमवारी सकाळी आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी बोलताना रवी राणा यांनी मी बोललेले सर्व शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले. (Bacchu Kadu and I are together I take my words back Apology expressed by Ravi Rana)

“गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जो वाद होता. जे शब्दा-शब्दांतून अनेक शब्द बाहेर निघाले. यावादावरून काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बैठकीसाठी बोलावले होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आमची बैठक झाली. जवळपास तीन ते साडेतीन तास ही बैठक झाली. काही मतभेद होते, काही विचार, भाषा किंवा बोलण्याची जी वाक्य होती ती न पटण्यासारखी होती. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यात आमदार आहेत. मी पण तिकडचाच आमदार आहे. आम्ही दोघेही या सरकारसोबत आहेत. जेव्हा एखाद्या विचारामध्ये मतभेद होते, त्यावेळी बोलता-बोलता तोंडातून निघालेले आहे. गुवाहटीच्या संदर्भात असेल किंवा आज मुख्यमंत्री असतील आणि इतर अपक्ष आमदार हे आमचे सहकारी आहेत. त्यामुळे काही वाक्य निघाले असेल, तर मी माझे वाक्य मागे घेत आहे. परंतु, बच्चू कडू यांच्याही तोंडातून काही अपशब्द बाहेर निघाली होती. ज्या पद्धतीने ते बोलले होते, ते म्हणजे मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो. त्याचे हे वाक्य न पटणारे होते. शिवाय अनेक खालच्या स्तरावर त्यांनी जी भाषा केली होती, त्यामुळे मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते त्यांचे शब्द मागे घेतली”, असे रवी राणा यांनी म्हटले.

“आम्ही दोघेही एकत्र आहोत. या सरकार सोबत आहे. सरकारचे घटक असून, पुर्ण ताकदीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत उभे आहेत. त्यामुळे या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची उन्नती आणि राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मजबूत सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपामध्ये महाराष्ट्रात उभे आहे. महाराष्ट्रात जे मागील दोन वर्षात प्रश्न निलंबित राहिलेत, जे उद्धव ठाकरे पुर्ण करू शकलेले नाही. ते सर्व प्रश्न हे सरकार जलद गतीने मार्गी लावत आहे”, अशा शब्दांत रवी राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“तीन महिन्यांमध्ये ज्या गतीने सरकारला पुढे आणले. शेतकरी असो, शेतमजूर असो, किंवा कामगार असो किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न असो प्रत्येक प्रश्नाला या सरकारने तोडगा काढून पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे अमच्या या वादापेक्षा कुणाचे मन दुखावले असेल, अपशब्दाचा वापर केला असेल, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आणि मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द मागे घेऊन हा विषय संपवत आहे. तसेच, मला अपेक्षा आहे की, बच्चू कडू यांनी वापरलेले शब्द मागे घेतली. आणि मी या सगळ्याबाबत दिलगीरी व्यक्त करत आहे”, असेही त्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री दोन्ही ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले होते. त्यानंतर त्यांच्यात बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीसही तेथे उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिका कॅगच्या रडारवर, 12 हजार कोटींच्या कामांची होणार चौकशी

First Published on: October 31, 2022 11:21 AM
Exit mobile version