आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा; तत्काळ जामीन मंजूर

आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा; तत्काळ जामीन मंजूर

A letter from Sharad Pawar and inclusion of 52 castes in OBC Bacchu Kadu said directly true OBC leader

नाशिकः अपंगांच्या प्रश्नांसाठी नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर न्यायालयाने बच्चू कडू यांना सशर्त जामीनही मंजूर केला. या शिक्षेविरोधात बच्चू कडू उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

२०१७ मध्ये ही घटना घडली. नाशिक महापालिकेत अपंगांसाठी राखीव असलेला तीन टक्के निधी खर्च न झाल्याने आमदार कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्यावेळी कडू यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती.  सरकारवाडा पोलिसांत याचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचा खटला सुरु होता. यासाठी दोषी धरत न्यायालयाने कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आमदार कडू यांनी जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका करणार असल्याचे आमदार कडू यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

बच्चू कडू नेहमीच शेतकरी आणि अपंगांच्या समस्या सोडवण्यासाठी आक्रमक होत असतात. बच्चू कडू हे त्यांच्या शोले स्टाईल आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. आमदार कडू जेथे जातील तेथे कार्यकर्ते “आपला भिडू बच्चू कडू’असा नारा का लावतात, याची प्रचिती गेल्या महिन्यात आली. आमदार बच्चू कडूंनी आक्रमक होत नागपुर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यास भाग पाडलं. त्यामुळे संतप्त शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावासंदर्भातली तहकूब केलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली होती. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडून लिलावासंदर्भातली नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले होते. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी बच्चू कडूंना यासंदर्भात निवेदन दिले होते. तेव्हाच त्यांनी जिल्हा बॅंकेची लिलाव प्रक्रिया उधळून लावण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे ते जिल्हा बॅंकेवर धडकले आणि त्यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले.

First Published on: March 8, 2023 4:20 PM
Exit mobile version