बच्चू कडू सत्तेत, तरी नाशकात प्रहार संघटनेवर आंदोलनाची वेळ

बच्चू कडू सत्तेत, तरी नाशकात प्रहार संघटनेवर आंदोलनाची वेळ

नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार विनंती करुनही दाद मिळत नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी (दि.13) जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर निषेध आंदोलन केले. जिल्हा परिषदेतील बांधकाम, शिक्षण, सामान्य प्रशासन, कृषी, समाजकल्याण, या विभागांकडून सामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके यांनी केली.

बांधकाम विभागाकडून कामांमध्ये अनियमता,नियमबाह्य कामे वाटप करणे, जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांकडे समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष होते. याविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे अनेकदा तक्रार केली. परंतु, त्यांनी कुठल्याही स्वरुपाची दाद दिली नाही.शिक्षण विभाग असेल किंवा समाजकल्याण या विभागांना पूर्णवेळ अधिकारी मिळत नसल्याने दिव्यांग व्यक्तींची कामे प्रलंबित आहेत. प्रहार संघटननेने प्रशासन अधिकार्‍यांच्या विरोधात घोषणादेत निषेध नोंदवला. यावेळी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, शरद शिंदे, जिल्हाप्रमुख संतोष गायधनी, अमजद पठाण, शहरप्रमुख श्याम गोसावी, मंगेश खरे, कमलाकर शेलार, मिलिंद वाघ, भाऊसाहेब मोरे, कृष्णा कुंदे, मिराबाई भोईर, शैला कुंदे, पी. टी. वाणी, हेमंत वाणी, मिरा भोईर, निलिमा पगार, वैशाली अनवट, दशरथ पुरकर, संजय दहिवडकर आदी उपस्थित होते.

बच्चू कडुंच्या सूचनेकडेही दुर्लक्ष 

बच्चू कडू यांनी वर्षभरापूर्वी नाशिक जिल्हा दौर्‍यावर असताना त्यांनी जिल्हा परिषदेत याबाबत बैठक घेत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच आंदोलकांसोबत समन्वयाने अडचणी समजून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच वेळोवेळी इतरही काही विषयांवर शासन आदेशही केले आहेत. तरीही अद्याप पर्यन्त जिल्हा परिषद प्रशासनाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

First Published on: September 13, 2022 7:24 PM
Exit mobile version