Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन

Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन

Rahul Bajaj Passes Away: बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन; ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बजाज म्हणजे स्कूटर असे देशवासियांच्या मनात समीकरण तयार करणार्‍या देशातील आघाडीच्या बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. रुबी हॉल क्लिनीकमध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी राहुल बजाज यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून आकुर्डीतील कंपनीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

मागील दोन महिन्यांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये राहुल बजाज यांच्यावर उपचार सुरू होते. वयोमान तसेच हृदयाचा आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर शनिवारी दुपारी अडीच वाजता त्यांचे निधन झाले. राहुल बजाज यांच्या जाण्याने बजाज समूहाचा आधारस्तंभ हरपला. त्यांनी पाच दशके बजाज ऑटो समूहाचे नेतृत्व केले. बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. गेल्या काही काळापासून राहुल बजाज आजारी होते. तसेच बजाज समूहाच्या दैनंदिन कारभारापासन ते गेल्या बर्‍याच वर्षांपासून अलिप्त होते.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली कोलकातामध्ये झाला होता. त्यांनी दिल्ली महाविद्यालयातून अर्थशास्त्रामध्ये ऑनर्स डिग्री, मुंबई महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले होते. बजाज त्यांनी ६०च्या दशकात बजाज समूहाचे नेतृत्व स्वीकारले. २००५ साली त्यांनी आपले अध्यक्षपद सोडले आणि त्यानंतर सुपुत्र राजीव बजाज यांनी ही जबाबदारी सांभाळली.

राहुल बजाज यांचा विवाह 1961 साली रुपा घोलप या महाराष्ट्रीयन तरुणीसोबत झाला. या जोडप्यांना राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुले आहेत. राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे स्वातंत्र्य सैनिक होते. जमनालाल बजाज यांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत.

हमारा बजाज

‘बुलंद भारत की, बुलंद तस्वीर…. हमारा बजाज’ ही दूरदर्शनवर 19८९ साली आलेली जाहिरात घराघरात पोहोचली होती. ही जाहिरात आठवत नाही असा एकही भारतीय असू शकत नाही. बजाज म्हणजे स्कूटर, ज्याची ही जिंगल आठवण करून देत असे. करोडो लोकांच्या मनात अशी जागा क्वचितच इतर कोणत्याही जाहिरातीने निर्माण केली असेल. त्या काळी घरासमोर बजाज चेतक स्कूटर असणारा माणूस श्रीमंत समजला जायचा 1980 मध्ये बजाज ही स्कूटर निर्मितीमधील एकमेव कंपनी होती. त्यांच्या चेतक स्कूटरला एवढी मागणी होती की, या स्कूटरसाठी १० वर्षांंचा वेटिंग पिरीयड होता.

कोरोना काळात १०० कोटींची मदत

राहुल बजाज यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचली. उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी २००१ मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 2006 ते 2010 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्यही होते. राहुल बजाज हे समाजकार्यासाठीही अनेकदा मदत करायचे. कोरोना काळात २०२० मध्ये त्यांनी बजाज समूहाच्यावतीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले. भारतीय उद्योग क्षेत्रातील ते नायक होते. त्यांच्या कामाने कॉर्पोरेट क्षेत्र नव्याने उदयास आले. बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे

– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

 

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगार निर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीत देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे.

– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

राहुल बजाज यांच्या निधनाने मला फार मोठा धक्का बसला. प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे ते नातू. त्यांनी टू व्हिलर तंत्रज्ञानाने समाजात परिवर्तन घडवून आणले. विशेषत: त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणले होते.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने समाजासाठी प्रचंड आस्था असलेले व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. ही उद्योग जगताची तर मोठी हानी आहेच, पण एक चांगला समाजसेवक सुद्धा आपण गमावला आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते


 

First Published on: February 13, 2022 6:45 AM
Exit mobile version