‘बालगंधर्व’ पर्वाचा पुण्यात अस्त

‘बालगंधर्व’ पर्वाचा पुण्यात अस्त

बालगंधर्व रंगमंदिर (फाईल फोटो)

पुण्यातील ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही वास्तू म्हणजे पुण्याची शान आणि पुणेकरांसाठी अभिमान. मात्र, शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचं स्थान असलेलं आणि सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेलं बालगंधर्व रंगमंदिर लवकरच पाडलं जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडल्यानंतर त्याठिकाणी बहुमजली आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त रंगमंदिर संकुल उभारण्यात येणार आहे. ‘बालगंधर्व’च्या रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबधी आराखडे महापालिकेने वास्तुविशारदांकडून मागवले आहेत. तसंच नवं-कोरं रंगमंदिर उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून अन्य आवश्यक प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, नवीन वर्षांत अर्थात २०१९ मध्ये बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार आहे. नुकताच या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे आजवर पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि पुण्यातील अनेक पिढ्यांचं मनोरंजन करणाऱ्या ‘बालगंधर्व’च्या पर्वाचा अस्त होणार असंच म्हणावं लागेल.

प्रकल्पाला होणार विरोध?

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी कलाकार, रंगकर्मी आणि प्रेक्षकांच्या सोयीचा विचार करून बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू साकारली होती. त्याच पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांतच बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, बालगंधर्व थिएटर तोडून त्याचा पुनर्विकास करण्याला पुणेकरांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासोबतच कलादालनं, नाट्यगृहांच्या नूतनीकरणावर, महापालिकेच्या चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालगंधर्व थिएटरचा पुनर्विकास करण्याचं निश्चित करण्यात आलं असून, या कामासाठी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कामाला लोकांकडून किंवा अन्य कुणाकडून विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘बालगंधर्व’चा इतिहास थोडक्यात

पुणे शहराची शान असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचं भूमिपूजन, खुद्द बालगंधर्वांच्या हस्ते ८ ऑक्टोबर १९६२ रोजी करण्यात आलं. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, २६ जून १९६८ ला रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच महापालिकेच्या वतीने या वास्तूचे नूतनीकरणही करण्यात आलं होतं. बालगंधर्व रंगमंदिराने १९६८ ते २०१८ या ५० वर्षांच्या काळात नाट्यरसिकांची अविरत सेवा केली आहे.

First Published on: December 7, 2018 9:02 AM
Exit mobile version