रत्नागिरीतील मराठी शाळांमध्ये आयटम सॉंगवर बंदी

रत्नागिरीतील मराठी शाळांमध्ये आयटम सॉंगवर बंदी

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने

रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी घेतलेला एक निर्णय सध्या राज्यातील शिक्षणक्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. शाळांमधील संस्कृती आणि महाराष्ट्राच्या विविध स्तरांवरील लोककला टिकून राहण्यासाठी यापुढे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मराठी किंवा हिंदी आयटम साँगवर बंदी घालण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष रोहन बने यांनी हा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्नेह मेळाव्यात हिंदी किंवा मराठी चित्रपटातील आयटम साँगचे शाळेत सादरीकरण करता येणार नाही. शाळेच्या चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही कार्यक्रमात हिंदी किंवा मराठी चित्रपटातल्या आयटम साँगवर नृत्य करण्यास विद्यार्थ्यांना परवानगी मिळणार नाही.

काय आहे या निर्णयामागचा हेतू?

जिल्हा परिषदेची शाळा ग्रामीण महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्कृतीचा पाया मानली जाते, आणि दुसरीकडे इंग्रजी भाषा काळाजी गरज ठरत असताना जिल्हा परिषदेच्या शाळांना दुय्यम लेखले जाते. यामुळेच महाराष्ट्रातील संस्कृती टिकावी आणि जिल्हा परिषद शाळांमधून मुलांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी हा अनोखा निर्णय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला.

मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या दरवर्षीच्या सांस्कृतिक किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात आयटम साँग आता लावता येणार नाही. या निर्णयाचे पालक आणि शिक्षकांनी सुद्धा स्वागत केले आहे. तसेच आपण यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला सादर करू असे मुलांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या नियमामुळे मुलांमध्ये कितपत लोककलेविषयी आणि संस्कृतीविषयी आदर निर्माण होईल हे येणाऱ्या काळात कळेल.

First Published on: January 30, 2020 8:25 PM
Exit mobile version