कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (प्रातिनिधिक फोटे)

दुष्काळ, अनियमित पाऊस, पिकांना हमीभाव न मिळणे या सर्वांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यातच सावकारांकडुन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची हेळसांड होते. अशा परिस्थितीत बँक हा एकच आशेचा किरण शेतकऱ्यांना दिसतो. परंतु शेतकऱ्यांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न बँक अधिकारी घेत असल्याने सामान्यांमध्ये बँक अधिकाऱ्यांविरोधात संताप वाढत आहे. बुलढाण्यामधील दाताळ येथील एका मोठ्या बँकेच्या मॅनेजरने पीक कर्ज घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्याच्या पत्नीने याविरोधात तक्रार केली असून बँकेचा मॅनेजर आणि शिपायाविरोधात तक्रार केल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महिलेने फोनवरील संभाषण केले रेकॉर्ड

दाताळमधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ब्रँच मॅनेजर राजेश हिवसे याने हे कृत्य केले आहे. शेतकरी आणि त्याची पत्नी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेच्या शाखेत गेले होते. बँकेच्या औपचारीक कागदपत्रांची पूर्तता करत असताना हिवसे याने शेतकऱ्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर मागितला. शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा नंबर दिला. नंतर हिवसे याने शेतकरी महिलेसोबत अश्लील संभाषण करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मागणी पूर्ण केल्यास पीककर्जासोबत वेगळे पॅकेजही देऊ, असा निरोप त्याने शिपायामार्फत महिलेला पाठवला. महिलेने त्या अधिकाऱ्यासोबतचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड केले आहे. हे रेकॉर्डिंग तिने स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचे समजताच हिवसे आणि बँकेचा शिपाई हे दोन्ही आरोपी फरार आहेत. दाताळ पोलीसांनी आरोपींचा शोध घेणे सुरु केले आहे

दाताळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या फलकाला स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले

स्थानिकांनी केला निषेध

स्थानिकांनी या घटनेविरोधात तीव्र विरोध संताप व्यक्त केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक नेत्यांचा ‘बँक मॅनेजरच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे म्हटले आहे’.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळ येथील शाखेचा फलक
स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हटवला
First Published on: June 23, 2018 2:00 PM
Exit mobile version