भाजपात गेलेल्यांवर कारवाई चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा; संभाजीनगरमध्ये बॅनरची चर्चा

भाजपात गेलेल्यांवर कारवाई चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा; संभाजीनगरमध्ये बॅनरची चर्चा

ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना दाबण्याचं काम भाजपकडून सुरू आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे ईडी, सीबीआयसारख्या चौकशा लागलेले नेते जेव्हा  भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना क्लीनचीट मिळते असाही दावा विरोधकांकडून केला जातो. दरम्यान, रविवारी रात्री उशिराने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. त्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात रान पेटवले आहे. त्याचपार्श्वभूमीवर “भाजप नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा” असा मजकूर असलेले बॅनर्स संभाजीनगर येथे झळकावले आहेत. राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी हे बॅनर्स शहरात ठिकठिकाणी लावले आहेत.

अक्षय पाटील यांनी संभाजीनगर येथे लावलेले बॅनर्स आता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग असल्याचं सांगण्यात याविषयावर चर्चा होणं गरजेचं आहे, असं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत सांगितलं. त्यांनी हा विषय उचलून धरला होता. मात्र, राज्यसभेचे अध्यक्ष वंकय्या नायडू यांनी त्यांना तंबी देत याविषयावर चर्चा न करण्याच्या सूचना केल्या.

चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं असून त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे.जे.रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राऊतांना पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात आले. मात्र, कोर्टातील सुनावणीनंतर राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रविण राऊत फ्रन्ट मॅन

प्रविण राऊत हे नुसते फ्रन्ट मॅन असून संजय राऊत यांचा पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

प्रविण राऊत हे पत्राचाळीतील डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रूपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवण्यात आले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा राऊतांना झाला आहे.

First Published on: August 2, 2022 10:49 AM
Exit mobile version