भिमातिरी रंगला निवृत्तीनाथांचा स्नान सोहळा; पालखी पंढरपुरी दाखल

भिमातिरी रंगला निवृत्तीनाथांचा स्नान सोहळा; पालखी पंढरपुरी दाखल

तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा
राजेंद्र भांड । आपलं महानगर वृत्तसेवा

पंढरपूर : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वर येथून आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरीत पोहोचत आहे. त्र्यंबकेश्वर, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगण, अहमदनगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीची वाडी, चिंचोली असा २८ दिवसांचा व ४७० किलोमीटरचा प्रवास पालखी सोहळ्यातील ४७ दिंड्यांसह पांडुरंग कृपेने पूर्ण केला आहे, असे पालखी सोहळ्याचे प्रसिद्धीप्रमुख तथा विश्वस्त प्रा. अमर मारुती ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

पंढरीची वाडी येथील भोजन आटोपून पालखी सोहळा मंगळवारी (दि. २७) मोठ्या उत्साहात अभंग गात वाटचाल करीत होता. त्याला कारणही तसेच होते, पंढरपूर अवघ्या एक दिवसावर आले होते. त्यामुळे वारकरी नाचत गात होते. आनंदाला पुरते उधाण आले होते. वारीमध्ये वासुदेव, वाघ्या मुरळी, संबळ वाले हे सर्व घटक विठुरायाच्या चरणी आपली सेवा रुजू होण्याकरता पालखी सोहळ्यात सामील आहेत. ग्रामीण बोली भाषेत सांगायचे झाले तर पंढरपूर अवघे एक कोसावर राहिले आहे असे वारकरी एकमेकाला सांगत होते

नामस्मरणाच्या गजरात गुरसाळे गाव कधी आले कळलेच नाही. चोपदारांनी चांदीचा दंड उंचावताच सर्व वारकरी थांबले. गुरसाळे गावावरून पंढरपूर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे तेथे संत निवृत्तीनाथांच्या पादुकांची धावा आरती होते. तुका म्हणे धावा.. आहे पंढरी विसावा … हा अभंग सर्व वारकर्‍यांनी सामूहिक म्हटला. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची, निवृत्तीनाथ महाराजांची आरती झाली. धावा आरतीबाबतची आख्यायिका अशी आहे की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पंढरीला जात असताना वेळापूर नजीक टेकडीवरून त्यांना श्री विठ्ठल मंदिराचे कळसाचे दर्शन झाले आणि इथूनच ते पंढरपूरपर्यंत धावत गेले. अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच महाराष्ट्रातून जेवढ्या संतांच्या पालखी येतात त्या गुरसोळी गावाजवळ विसावा घेतात. संसाराने थकलेल्यांसाठी पंढरी हाच विसावा आहे. इथली ओढ विश्रांतीची आहे, इथली वाट विसाव्याची आहे या वाटेने चालत पंढरीला जाणे हा एक विसावा आहे.

धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडीली तो
संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शितळ ।

यासह अनेक अभंगांचे गायन झाले. संत निवृत्तीनाथांचे समाधी संस्थांनचे पुजारी ह.भ.प.जयंत महाराज गोसावी पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर यांनी आरती व पूजन केले. त्यानंतर हजारो वारकरी धावायला लागले. तुळशी घेतलेल्या महिला, टाळकरी, विणेकरी, पोलीस, डॉक्टर यासह सर्व सेवेकर्‍यांनी धावा आरतीचा धावत आनंद घेतला. चिंचोली गाव लागल्यानंतर भीमा नदीच्या तीरावर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आकाशात ढगांनी दाटी केली होती. नाथांच्या पादुका परंपरेप्रमाणे जयंत महाराज गोसावी यांनी डोक्यावर घेतल्या व हजारो वारकरी जय जय राम कृष्ण हरीचा गजर करत हातात ध्वज मुखी नाम घोष टाळांचा निघणारा एकच ध्वनी आसमंत उजळून टाकीत होता.

नाथांच्या पादुका भिमातीरी स्नानाला निघाल्या व वरूण राजाने हलकासा त्याला अभिषेक केला. वारकरी देखील त्यामुळे सुखावले होते. प्रत्येकाच्या तोंडी एकच अभंग होता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. वारकर्‍यांच्या साक्षीनं संत निवृत्तीनाथांचे भीमा नदीचे स्नान झाले व पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. यावेळी तरुणांची संख्या देखील पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ज्येष्ठ वारकरी देखील मोठ्या प्रमाणात वारीमध्ये परंपरेने सामील आहेत. महत्त्वाचे म्हणजे बरेच ज्येष्ठ वारकरी घराण्यातील चालत आलेल्या चालीरीतीप्रमाणे अनवाणी पायी वारी करतात. काही लहान मुले देखील वारीमध्ये सामील आहेत.

प्रसिद्धीप्रमुख अमर ठोंबरे यांच्याशी अधिक संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, यावर्षी वारीचा सोहळा प्रसिद्धी माध्यमांसह सोशल मीडियातून देखील पोहोचवण्यास मदत झाली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, रिल्सच्या माध्यमातून वारीचा सोहळा जगभर पसरला आहे व अखंड भारत वर्षाला वारीची अनादि काळापासून परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. : अमर ठोंबरे, प्रसिद्धीप्रमुख

First Published on: June 28, 2023 2:46 PM
Exit mobile version