बाजार समिती उमेदवाराच्या पुत्राची थेट आमदाराला धमकी; काय घडले नेमके?

बाजार समिती उमेदवाराच्या पुत्राची थेट आमदाराला धमकी; काय घडले नेमके?

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शिवाजी चुंभळे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे यांच्यावर अदखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत संपल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे शुक्रवारी (दि.२१) रोजी चिन्ह वाटप व याद्या जाहीर झाल्याने निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहे. नाशिक कृषी बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना शिंदे गट असे चित्र असले तरी पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिक लढत होतांना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.

महाविकास आघाडीमुळे इगतपुरी मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हेदेखील पिंगळे गटासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी झालेले आहेत. त्याचा राग मनात धरून शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी आमदार खोसकर यांना मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर चुंभळे यांचे चिरंजीव अजिंक्य चुंभळे यांनीदेखील आमदार खोसकर यांना धमकी दिली आहे. “मतदारसंघात फिरू नको, माझ्या बापाच्या नादी लागू नको, तू अजून आम्हाला ओळखले नाही. आमच्या नादी लागल्यावर काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार कर” अशा पद्धतीने वेळोवेळी धमकी दिली जात असल्याचे आमदार खोसकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले असून, गालबोट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First Published on: April 22, 2023 12:43 PM
Exit mobile version