बिडीओचा अपघातात दुर्दैवी अंत; पेपर तपासणीसाठी येत होते नाशिकला

बिडीओचा अपघातात दुर्दैवी अंत; पेपर तपासणीसाठी येत होते नाशिकला

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील यावल आणि अमळनेर तालुक्यात गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले एकनाथ चौधरी यांचा नाशिककडे येत असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांची कार ट्रकला मागून आदळल्यामुळे झालेल्या अपघातात चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.

नाशिकमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बढतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेची तपासणी करण्यासाठी चौधरी सकाळी नाशिकच्या दिशेने निघालो होते. नाशिक विभागीय आयुक्तालया मार्फत नुकत्याच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बढतीसाठी परीक्षा घेण्यात आल्या. त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या तपासणीचे काम जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात आज (दि.२३) रोजी करण्यात येत आहे. याकामी नाशिक विभागातील अनेक अधिकाऱ्यांना नाशकात पाचारण करण्यात आले होते. मात्र, सकाळी चौधरी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने संपूर्ण शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यलयाच काम परिषदेला का ?

सेवा जेष्ठतेनुसार बढती परीक्षा नाशिक विभागीय आयुक्तालया मार्फत घेण्यात आली. याबाबतच्या परीक्षांचे नियोजन तसेच प्रश्नपत्रिका तपासणीचे काम जिल्हाधिकारी कार्यलयामार्फत होणे अपेक्षित होते. मात्र, प्रश्नपत्रिका तपासणीचे काम जिल्हा परिषदेकडे देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रश्नपत्रिका तपासणीचे काम करणे अपेक्षित असताना ते जिल्हा परिषदेकडे का देण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे एकूणच प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे.

First Published on: November 23, 2022 4:53 PM
Exit mobile version